Tuesday, 26 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 26.12.2023 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 26 December 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      अफवांवर विश्वास न ठेवता कोविड पंचसूत्री पालनाचं राज्यशासनाकडून नागरिकांना आवाहन

·      माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

·      जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला येत्या शनिवारी तीस डिसेंबरपासून प्रारंभ

आणि

·      आज वीर बाल दिवस-नांदेड इथं सचखंड गुरुद्वाऱ्यात सर्वधर्म संमेलनाचं आयोजन

 

सविस्तर बातम्या 

कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचं पालन करावं, असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे. आवश्यकतेनुसार मास्क वापरावा, वारंवार हात साबणानं धुवावे, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं सुरक्षित अंतर असावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं, अणि इतरांना चुकीची माहिती देऊ नये, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. संशय वाटल्यास कोरोनासंबंधीची चाचणी स्वत:हून करून घ्यावी, असंही विभागानं सांगितलं आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरूच असून, आजारी रुग्णांवर तातडीनं उपचार देखील केले जात आहेत. नागरिकांना यासंदर्भात काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास  १०४ या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

 

Byte...

पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.

 

दरम्यान, राज्यात काल कोरोनाच्या २८ रुग्णांचं निदान झालं आणि १३ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातले १०० हून जास्त रुग्ण मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. कोरोनाच्या जे एन - वन  प्रकारच्या एकूण १० रुग्णांची नोंद राज्यात आतापर्यंत झाली असून, हे सगळे रुग्ण गृह विलगीकरणातच बरे झाले आहेत.

****

काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथं होणार आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपूर इथं प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. हा मेळावा आयोजित करण्यात आलेल्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे, या निमित्तानं एक महारॅली काढण्यात येणार असून, है तय्यार हम, असं या रॅलीचं घोषवाक्य असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती काल देशभरात सुशासन दिवस म्हणून पाळण्यात आली. अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षालाही कालपासून सुरुवात झाली. या निमित्ताने राज्यभरातही विविध कार्यक्रम घेण्यात आले, पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुरस्कारांचं वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना २०२२ साठी आणि उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांना २०२३ साठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल सायंकाळी अटलजींच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

धाराशिव इथल्या लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं काल वाजपेयींच्या जयंतीदिनी वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथं उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक विद्यासागर कोळी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

जालना - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ही माहिती दिली.

तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल. यावेळी आपण स्वत: मनमाड पर्यंत प्रवास करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

या गाडीची जालना इथली नियमित वेळ पहाटे पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटं असेल, असं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.

जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

वीर बाल दिवस आज पाळला जात आहे. शीख धर्माचे गुरु गोविंदसिंह यांची मुलं साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. त्यांच्या अतुलनीय शौर्य गाथेची नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना माहिती करून देण्याच्या उद्देशानं  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आज 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

आज नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव काल सहभागी झाले होते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं, असं आवाहन यादव यांनी यावेळी केलं. विविध लाभधारकांना त्यांच्या लाभाचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते.

****

या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले.

****

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल अनावरण करण्यात आलं. शंभराव्या नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारं ठरेल, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

****

नांदेड शहरातल्या भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत बारा घरफोड्या करणाऱ्या अभिजित उर्फ अभय राऊत या आरोपीला पोलिसांनी काल अटक केली. त्याच्याकडून ३५ तोळे सोनं, सुमारे अर्धा किलो चांदी आणि इतर साहित्य असा एकूण पंचवीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

दत्तजन्मोत्सवाचा सोहळा आज सर्वत्र साजरा होत आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथल्या श्री दत्त शिखर संस्थान इथं दत्त जयंती उत्सव सुरू आहे. काल महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या हस्ते दत्त जन्म सोहळा धार्मिक उत्सवात पार पडला. भक्तांनी दत्तदर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून सेंच्युरीयन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: