Thursday, 28 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.12.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date : 28 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

भविष्यातल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडुंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनानं खेळाडुंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीनं वाढ केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. चंद्रपूरमधल्या बल्लारपूर इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. या स्पर्धेत देशभरातून सुमारे एक हजार ५५१ खेळाडू सहभागी झाले आहेत. २०३६ मध्ये भारतात ऑलोम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून, या स्पर्धेत चंद्रपूरचे खेळाडू अनेक पदकं जिंकतील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

****

मुख्य सचिवांच्या तीन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला आज नवी दिल्लीमध्ये प्रारंभ होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. या मालिकेतली पहिली परिषद जून २०२२ मध्ये धर्मशाला इथं तर दुसरी परिषद दिल्लीतच जानेवारी २०२३ मध्ये झाली होती. सहकारावर आधारित संघवादाच्या सिद्धांताला मूर्त रुपात बदलण्याच्या पंतप्रधानांच्या उद्देशाला पूरक ही परिषद आहे. केंद्र तसंच राज्य शासनांदरम्यान  देवाणघेवाण वाढवण्याचाही या परिषदेचा उद्देश आहे.  या परिषदेत केंद्र शासन, राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

****

केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरूवात झाली असून आज ही यात्रा ऐरोली विभागात दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं शहरी भागासाठी पंधरा विविध प्रकारच्या योजना आखून दिल्या असून त्याविषयीची माहिती कार्यक्रम स्थळी प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणं केंद्र सरकार, राज्य शासन तसंच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांच्या ठिकाणी  दालनं थाटण्यात आली आहेत. 

****

भारतीय ऑलिंपिक संघानं, निलंबित केलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचं दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. भूपिंदर सिंह बाजवा या समितीचे अध्यक्ष तर एम. एम. सोमाया आणि मंजुषा कंवर सदस्य असतील. कुस्ती महासंघ चालवण्याच्या जबाबदारीसोबतच ही समिती, खेळाडुंची निवड, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग यासह अन्य जबाबदाऱ्या पार पाडेल. कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी नियमांचं उल्लंघन केलं तसंच वाटेल तसे निर्णय घेतले असून ऑलिंपिक समितीच्या निर्णयांना डावललं असल्याचंही ऑलिंपिक समितीनं म्हटलं आहे.   

****

मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यात काल रात्री बस आणि एका वाहनाच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर तिन जन गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर प्रवासी बस उलटली आणि तिनं पेट घेतला. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

दाक्षिणात्य अभिनेते आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचं आज पहाटे निधन कोरोनामुळं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या १४ दिवसांपासून, त्यांच्यावर चेन्नईतल्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

****

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आता बहुद्देशीय आणि बहुउपायोगी सौर उर्जेवर चालणारा वृक्ष उभारण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना पारंपरिक उर्जेवरचे दिवे, संगीत, इंटरनेटसुविधा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही संकल्पना आहे. यामाध्यमातून पारंपारिक सौर उर्जेचा वापर करत पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारे चार सौर उर्जा वृक्ष  उभारले जात आहेत.

****

भारतीय संघाविरुद्ध सेंच्यूरियन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच बाद २५६ या धावसंख्येवरुन पुढं खेळायला सुरुवात करेल. भारतानं या सामन्यातल्या आपल्या पहिल्या डावात २४५ धावा केल्या आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी याच मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात आस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली आहे.

****

No comments: