Monday, 25 December 2023

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक : २५ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 25 December 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोनाच्या जे एन-वन व्हेरियंटचे देशभरात तीन हजार ७४२ रुग्ण;नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन

·     महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून व्यक्त

·     सावनेरचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाकडून रद्द

·      नाताळ निमित्त सर्वत्र येशू जन्माच्या देखाव्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

      आणि

·      ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

****

देशभरात कोरोनाच्या जे एन - वन या व्हेरियंटनं बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात कोरोनाच्या या नव्या स्वरुपानं बाधित एकूण तीन हजार ७४२ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोना प्रतिबंधक आणि सुरक्षाविषयक नियमांचं पालन करत राहावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. या व्हेरियंटचे महाराष्ट्रात नऊ रुग्ण असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून, आपण घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं, सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल एक महिला कोरोना बाधित आढळून आली. सध्या शहरात चार बाधितांवर उपचार सुरु आहेत.

****

देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विकसित भारत यात्रेदरम्यान संवाद साधत होते. या यात्रेच्या माध्यमातून गरजूंना पायाभूत सुविधा प्राप्त होऊन, पुढच्या २५ वर्षांत देशाचा महासत्तेपर्यंत प्रवास पूर्ण होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...

दुनिया का सबसे बडा देश बनना हैं. तो इस साल सरकारी योजनाओं कों सौ प्रतिशत लोगों तक पहुंचा करके, विकास के गती को आगे बढाना है. बुनियादी चिजो का अर्थ है, यानी स्वस्थ का कार्ड पहुंच जायेगा. गरिब के लिए स्वनिधी योजना पहुंच जायेगी. अगर उज्वला योजना पुरी हो जायेगी,घर घर बिजली का काम पुरा हो जायेगा. हर एक के पास पंतप्रधान आवास पूरा हो जायेगा. तो इसके बाद, पच्चीस सालों मे भारत को महाशक्ती बनाने के यात्रा की ओर ले जायेगा. हमारा विकास ऐसा होना चाहिए देश मे, स्त्री पुरुष समानता हो,बल्की की विकास की गाडी मे महिलाओ की आर्थिक संपन्नता, महिलाओ को रोजगार के अवसर बढने चाहिए.

यादव यांनी या यात्रेदरम्यान, फळ विक्रेता तसंच शहाळे विक्रेता यांच्याशी संवाद साधला. फळ तसंच शहाळे खरेदी करून, त्यांनी यूपीआय पेमेंट द्वारे विक्रेत्याला पैसे अदा केले. जय भवानी नगर तसंच सातारा परिसर इथं झालेल्या कार्यक्रमात यादव यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. जय तुळजा भवानी बचत गटाच्या महिलांनी आठ लाखांचं कर्ज घेऊन सुरू केलेल्या कापड दुकानासही त्यांनी सदिच्छा भेट दिली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थींनी आपले अनुभव सांगितले.

****

नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. याअंतर्गत शहरातल्या हडको आणि नमस्कार चौक या भागात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

परभणी जिल्ह्यातलया बोरवंड बुद्रुक इथं काल या यात्रेदरम्यान, शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी करून त्यांना कार्ड वाटप करण्यात आलं.

****

संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आलं असून, लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत काल सकाळी मुंबईत वरळी इथं स्वच्छता मोहिमेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

****

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाने रद्द केलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यव्हार केल्याप्रकरणी, नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सचिवालयाने केदार यांचं सदस्यत्व रद्द केलं.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून साजरी केली जात आहे. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे.

****

 

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करुन प्रार्थना करण्यात आली. या निमित्तानं चर्चच्या प्रांगणात येशूच्या जन्माचा देखावा उभारण्याची प्रथा आहे. आजही दिवसभर कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघ निलंबित केला आहे. पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित करण्याचे निर्देश क्रीडा मंत्रालयानं दिले असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात काल चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं ७५ धावांचं आव्हान, भारतीय संघानं दुसऱ्या डावात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती. सामन्यात सात बळी घेणाऱ्या स्नेहा राणा हिला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

****

धाराशिव इथं २२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचं आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते काल उदघाटन झालं. धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धा उद्यापर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक आणि मार्गदशक दाखल झाले आहेत. दरम्यान, या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आमदार कैलास पाटील तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेती तीरंदाज अदिती स्वामी, तिचे मार्गदर्शक प्रवीण सावंत, आंतरराष्ट्रीय तीरंदाज आर्यन गरड यांचा गौरव करण्यात आला.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली आहे. उप मुख्य प्रशासकपदी भाजपा जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अशासकीय प्रशासकीय मंडळात अन्य १४ जणांचा समावेश आहे.

****

लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काल हर घर दस्तक मोहिमेंतर्गत घरोघरी भेट देत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना असलेल्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं, श्वा गोजमगुंडे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

 

 

No comments: