Wednesday, 27 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोड धंद्यांचा आधार घ्यावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      विकसित भारत संकल्प यात्रेचं वैजापूरमध्ये स्वागत

·      डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या धोरणामुळे शेतकरी बनला उर्जादाता - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आणि

·      राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आजपासून

****

शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोड धंद्यांचा आधार घेतला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती इतरांनाही द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारत यात्रा १५ नोव्हेंबरला सुरू झाल्यापासून पंतप्रधान सातत्यानं लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

****

विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ . भागवत कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या वेळी दिव्यगांना साहित्य वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास उपस्थित सुमारे ८०० नागरिकांनी यावेळी विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला. विकसित भारत संकल्प यात्रेचं नांदेड इथं उत्साहानं स्वागत झालं. नांदेड इथल्या लाभार्थ्यांनी आकाशवाणीकडे या यात्रेसंदर्भात भावना व्यक्त केल्या.

बाईट - अर्चना रेवणवार आणि प्रकाश कदम, जि.नांदेड

****

देशभरात गेल्या २४ तासात कोविडचे ७७ नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या चार हजार ९३ कोविड रुग्ण उपचाराधीन असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या २४ तासात ६०३ कोविड रुग्णांना घरी पाठवण्यात आलं असून तीन जणांचा मृत्यू झाला. कोविडच्या नव्या प्रकाराची लागण देशभरात झाली असून राज्यात या प्रकारचे ९ रुग्ण आढळले आहेत.

****

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या धोरणानं देशातला अन्नदाता आज इंधन, इथेनॉल आणि उर्जादाता झाला असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अमरावती इथं मुख्य कार्यक्रम झाला, त्यावेळी गडकरी बोलत होते. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना यावेळी पहिला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

देशाचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त डॉ.देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिकेतही डॉ. देशमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही आज पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.

****

नागपूर इथं काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त उद्या परिवर्तानाचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना या संदर्भातली माहिती दिली. देशाची लोकशाही व्यवस्था धोक्यात असू, ही व्यवस्था अबाधित राखणं यावर काँग्रेस पक्षानं लक्ष केंद्रित केलं असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, तसंच नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

****

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं आज अकोला इथल्या विद्यापीठ क्रीडांगणात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि महोत्सव - अॅग्रोटेक प्रदर्शन २०२३ चं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

माजी आमदार तथा जनता दल सेक्यूलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचं आज सकाळी सांगली इथं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. शरद पाटील हे १९९० आणि १९९५ अशा दोन वेळा कुपवाड-मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. तर २००२ ते २००८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रकाश जावडेकर यांचा पुणे पदवीधर मतदार संघात पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले होते. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे ते विश्वासू होते. मिरज इथल्या यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते.

****

दक्षिण आफ्रिका संघानं सेंच्यूरियन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताविरुद्ध तीन बाद १३० धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, भारतानं काल पहिल्या दिवस अखेर केलेल्या आठ बाद २०८ धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. काल नाबाद असलेल्या के. एल. राहुलनं सुरेख फलंदाजी करत आपलं शतक पूर्ण केल्यामुळे भारताला २४५ धावांपर्यंत मजल मारता आली.

****

तंबाखूच्या व्यसनामुळे तरूण पिढीचं नुकसान होत असून हे थांबवण्यासाठी लोकजागृती करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन बीडच्या जिल्हाधिकारी दिपा-मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची आर्थिक वर्षातील व्दितीय त्रैमासिक आढावा बैठकीचं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरच्या क्रीडा संकुलावर १९ वर्षाखालील मुला, मुलींची ६७ वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उदघाटन होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे. यासाठी आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडं असणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या लोकांकडं आयुष्यमान गोल्डन कार्ड नाही अशा व्यक्तींसाठी संपूर्ण जिल्हाभर उद्या विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, अंगणवाडी केंद्र, सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मुख्य ठिकाण, चौक, रेशन दुकाने, सेतु सुविधा केंद्र, गर्दीची ठिकाण ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर विभागातल्या अकरा शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उद्या छत्रपती संभाजी नगर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये होणार आहेत. शंभर मीटर, दोनशे मीटर आणि चारशे मीटर तसंच चार गुणीले शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धा यात होणार आहेत. लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच आणि खो-खो, कबड्डी या स्पर्धाही या अंतर्गत होत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना, बीड, परभणी इथले १४ आणि १७ वर्षे वयोगटातले विजयी संघ उद्या या स्पर्धेत सहभागी होतील, असं समाज कल्याण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

 

धुळे शहराच्या प्रलंबीत पाण्याचा प्रश्न आपल्या सरकारनं सोडवला असून धुळेकरांना दिलेला शब्द आपण पाळला असल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून धुळ्यासाठी अक्कलपाडा इथल्या प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी महाजन बोलत होते. हा प्रकल्प १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेअंतर्गत विज देयकांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'ई-मेल' 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना बचत करण्याची संधी मिळत आहे. या परिमंडळातल्या पर्यावरणस्नेही २० हजार ४१२ ग्राहकांकडून २४ लाख ४९ हजार ४४० रुपयांची वार्षिक बचत या अंतर्गत सुरू असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

****

No comments: