Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 30 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकातून दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला रवाना केलं. यासह इतर पाच वंदे भारत आणि दोन अमृत भारत रेल्वेला देखील यावेळी सुरुवात करण्यात आली.
जालना इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. २०१४ पासून अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विशेष तरतूद करण्यात येत असल्याचं दानवे यावेळी म्हणाले. देशात २०२४ पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्गाचं विद्युतिकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रगत राष्ट्रातली रेल्वे जशी असते, तशी वंदे भारत रेल्वे तयार करण्यात आल्याचं, फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातली ही सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून सुरु झाल्याबद्दल त्यांनी संपूर्ण मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं.
दरम्यान, अयोध्या इथं नूतनीकरण करण्यात आलेल्या अयोध्याधाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाच्या उद्घाटनासह, १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
राज्य शासनाच्या महासंकल्प रोजगार अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेतल्या उमेदवारांना काल मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. राज्यात खात्रीशीर, दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणं, हे राज्य वीज कंपनी समोर आव्हान असून, यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी सरकार तिनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या १६ नगरपरिषद आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात आजपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरु होत आहे. अर्धापूर नगरपंचायतपासून या यात्रेला सुरुवता होत असून, नागरीकांना विविध योजनांची माहिती दिली जात आहे. नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करावेत, योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या तालुका क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभागाला औसा शहरातील जलसंपदा विभागाची अडीच हेक्टर जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली होती, त्यानंतर ही मान्यता देण्यात आली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर इथं आजपासून विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. एक जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरु राहणार असून, शहरातल्या सर्व नव मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे यांनी केलं आहे.
****
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य आणि पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रमाअंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी या घटकांचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात अर्ज मागवण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकरी यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आठ जानेवारीला लोकशाही दिनाचं तसंच विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तक्रारदारांनी आपले अर्ज विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा करावेत, असं कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात कोंडेदर वळणा जवळ खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले. जखमींना माणगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी ही बस पुण्याहून माणगाव कडे जात असताना रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाल्याने हा अपघात झाला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांदरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment