Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर
लक्ष केंद्रीत करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन-वीर बाल दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं
आयोजन
·
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज
'इम्फाळ विनाशिका' नौदलाच्या सेवेत दाखल
·
विकसित भारत संकल्प यात्रेला
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आणि
·
जालना इथं येत्या २८ आणि २९
डिसेंबरला भरड धान्य मेळाव्याचं आयोजन
****
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. आज वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं एका विशेष
कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. जीवनात निर्धारित उद्दीष्टं साध्य करण्यासाठी निरोगी
शरीर आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शीखांचे धर्मगुरू श्री गुरु गोविंद
सिंग यांचे पुत्र, साहिबजादा बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग, यांचं स्मरण करताना, त्यांचं बलिदान ही राष्ट्रीय प्रेरणा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त
केली. भारत आता आपल्या वारशाचा अभिमान बाळगत असून, त्यामुळे जगाचाही
भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
वीर बाल दिनानिमित्त नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री
सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान
यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास
पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मुख्यालयात वीर बाल दिवसा निमित्त साहिबजादा
बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग यांना अभिवादन करण्यात आलं.
मागील वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून देशभरात पाळला जातो आहे.
****
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका'
आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. देशाच्या सागरी हद्दीत
जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राजनाथ सिंग यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची
लांबी १६३ मीटर तर वजन सात हजार चारशे टन आहे. आजपर्यंत सर्वात कमी कालावधीत तयार झालेली
युद्ध नौका असून यातलं ७५ टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे.
****
बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारा विचार प्रत्येक घरापर्यंत
पोहोचेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात ५० व्या
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. नियमित शिक्षण घेताना
विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला
चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि
बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी
शाळांमधून अशा प्रदर्शनांचं आयोजन व्हावं, अशी अपेक्षा
राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
ललित कला अकादमीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे
यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अंदमानात स्वातंत्रवीर सावरकरांच्या
सन्मानार्थ उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यज्योतीचे ते निर्माते होते. मुंबईतील पश्चिम
द्रूतमार्गावर कांदिवली इथं उभारण्यात आलेला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांचा पूर्णाकृती पुतळा ही पाचरणे यांची मुंबईतील शेवटची शिल्पकृती ठरली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद
डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या
कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोयासन
विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता यासाठी
केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीसांना या पदवीनं सन्मानित करण्यात आलं
****
ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहून आपल्या हक्काचं संरक्षण
करावं, असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
यांनी केलं आहे. ते आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या
डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी
व्यक्त केली. डिजिटल इंडिया ॲक्ट, ग्राहक सुरक्षा कायदा या विषयी
नागरिकांनी माहिती घेतली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर
परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचे आज जालना जिल्ह्यातल्या लावणी, आर्डा तोलाजी, झिरपी, मालखेडा इथं
पोहचली. यावेळी ग्रामस्थांनी यात्रेचं स्वागत करून कार्यक्रमात सहभाग घेत पंतप्रधान
किसान सन्मान निधी आणि पीक वीमा योजनेमुळं शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं सांगितलं.
जालना इथले गजानन रानोटे आणि परभणीचे मुरलीधर तायनात यांनी आपल्याला मिळालेल्या
लाभाची माहिती दिली.
बाईट - गजानन रानोटे, जि.जालना आणि मुरलीधर तायनात, जि.परभणी
लातूर जिल्ह्यात आज विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती
देण्यात आली. लाभार्थ्यांना विविध लाभांचं वितरण करण्यात आलं, तसंच योजनांसाठी नाव नोंदणी करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचं
आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
जालना इथं येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी, "भरड धान्य
मेळावा-२०२३"चं आयोजन करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन,
कृषी विभाग आणि जालना एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं जेईएस
महाविद्यालय परिसरात आयोजित या मेळाव्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आलं आहे. या निमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी
विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मुख्य मेळाव्याच्या
ठिकाणी दोन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसंच भरड
धान्यापासून बनवण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ३० स्टॉल राहणार आहेत. २८
डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून
विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य
लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
भारत निर्वाचन आयोगाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं
प्रात्यक्षिक जनतेला दाखवण्यात आलं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या यंत्रांबाबत
माहिती जाणून घेतली. अनेकांनी हे यंत्र प्रत्यक्ष हाताळून पाहिलं. केंद्र सरकारच्या
या जनजागृती मोहिमेला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पूर्णा -परळी या पॅसेंजर रेल्वेच्या एका
बोगीला आज सकाळी आग लागली. आज सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही
गाडी उभी असताना, अचानक एका बोगीतून धूर निघत असल्याचं लक्षात
आलं. लगेच या आगीनं रौद्र रूप धारण केलं. रेल्वे विभाग आणि नांदेड महापालिका अग्निशमन
दलानं ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळं कोणतीही प्राणहानी झाली नाही. या आगीची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
****
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण
इथं काल झालेल्या आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या दोन जिम्नैस्टनी
प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. दहा वर्षांखालील गटात हर्षिका बेवाल
हिनं सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला
हिनं रौप्यपदक पटकावलं. या दोन्ही बाल जिम्नैस्टचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे.
****
No comments:
Post a Comment