Friday, 29 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला उद्यापासून प्रारंभ

·      अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाची सुमारे तेराशे ऐंशी कोटी रुपयांची मागणी

·      नौदल अधिकाऱ्यांसाठी नवी स्कंधपट्टिका जारी;छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश

आणि

·      विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा दोन कोटींहून अधिक नागरिकांना लाभ

****

जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना रेल्वेस्थानकात उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्य्रकमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी आज जालना इथं दिली. दरम्यान, काल या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जालना रेल्वेस्थानक परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत रेल्वे सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय ठरत आहे.

****

राज्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी कृषी विभागानं राज्य सरकारकडे १ हजार ३७९ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी कृषी विभागानं शासनाकडे केली आहे.

****

राज्यात चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत एकूण ३४० कोटी ४३ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं, त्यातून २९३ कोटी ८१ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. दरम्यान, यंदा सरासरी उत्पादनात सत्तावन्न दशांश टक्क्यांनी घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, तर नांदेड विभागातील २९ कारखान्यांमध्ये यंदा ऊस गाळप सुरू आहे.

****

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं जाईल, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही वेळ द्यावा, असं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिक इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं आज पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी मुंबईत ट्रॅक्टरसह येऊ नये आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही महाजन यांनी यावेळी केलं.

****

भारतीय नौदलानं आज एडमिरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशातील स्कंधपट्टिका अर्थात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचे मानचिन्ह प्रसिद्ध केलं. या चिन्हाचा आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखा असून यात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे. सर्वसमावेशक दीर्घकालीन दृष्टीकोन असा या चिन्हाचा अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण इथं ४ डिसेंबरला झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात यासंदर्भातली घोषणा केली होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३१ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. न्यूज ऑन एआयआर या वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून देखील हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा आतापर्यंत दोन कोटींहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. एक लाखांहून अधिक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकांच्या क्षेत्रात यात्रेच्या वाहनानं भेट दिली. या आरोग्य शिबिरांमध्ये ८० लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी चाचणी झाली आणि त्यातल्या पावणे पाच लाखांहून अधिक संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

क्षयग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यासाठी ३६ हजारांहून अधिक रुग्णांच्या बँक खात्याची माहिती या दरम्यान गोळा झाली. साडे ८ लाख नागरिकांची सिकल सेलसाठी चाचणी झाली आणि त्यातल्या २७ हजारांहून अधिक रुग्णांचा रुग्णालयातून उपचार घेण्याचा सल्ला यात्रेत मिळाला. उच्च रक्तदाब, मधुमेह यासाठीही दीड कोटी नागरिकांची चाचणी झाली. साडे ३२ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड याअंतर्गत वितरीत झाली असून सुमारे दीड कोटी कार्ड तयार झाली आहेत

****

ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान नगर परिसरात पोहोचली. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. मंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना आयुष्मान कार्ड आणि गॅस जोडणी देण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश कराड यांनी दिले. नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कराड यांनी केलं. ते म्हणाले -

यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना घर देणे, उज्वला योजनेअंतर्गत गरीबांना गॅस देणे, आयुषमान भारत अंतर्गत पाच लाखाचा आरोग्याचा विमा देणे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाखाची मदत देणे अशा बऱ्याच योजना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात शहरी भागात आणि ग्रामीण भागात चालू आहेत. मी जनतेला आवाहन करतो, की या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सामील व्हा आणि स्वतःचा विकास करा. तुमचा विकास म्हणजे भारताचा विकास. गरीबीरेषेच्या वर आपल्याला या सर्व लोकांना आणायचंय.

२४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नांदेड महापालिका हद्दीत उद्या समारोप होणार आहे. या यात्रेअंतर्गत आज नांदेड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्यमान भारत कार्डसाठी नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली. सुमन धनाडे आणि निहाल शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

बाईट - सुमन धनाडे आणि निहाल शेख, जि.नांदेड

****

फ्रांस इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. इच्छुकांनी गुगल प्ले स्टोअरवरून 'स्कील इंडिया डिजीटल' हे ॲप डाऊनलोड करावं, या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल. एक जानेवारी २००२ किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

****

परभणी इथं आज पालम तालुक्यातल्या सिरपूर ते केरवाडी रस्त्याचे भूमीपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं. रस्त्यांचा विकास तसंच त्यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही, असं गुट्टे यावेळी म्हणाले. सिरपूरसाठी तीन वर्गखोल्यांची मंजूरी आणि सभागृहासाठी अकरा लाख रूपयांच्या निधीची घोषणा गुट्टे यांनी यावेळी बोलताना केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आठ जानेवारीला लोकशाही दिनाचं तसंच विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तक्रारदारांनी आपले अर्ज विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा करावेत, असं कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्या इथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून उद्या ३० तारखेला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

No comments: