Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २४ तारखेपासून राज्यभरात एकाचवेळी रास्ता
रोको आंदोलन करण्याचा मराठा समाज बांधवांचा निर्णय
· विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका
स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
· ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन, तसंच प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी
यांचं निधन
आणि
· हिंगोली,
बुलडाणा आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात जवळपास
५०० जणांना प्रसादातून विषबाधा
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसीमधून आरक्षणाच्या
मागणीसाठी मराठा समाज बांधव राज्यभरात येत्या २४ तारखेपासून प्रत्येक गावात रोज सकाळी
साडे दहा वाजता एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी
काल घेतलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं, मात्र
ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली
सराटी इथं पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीत रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात
आला. सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात येत असून, हे
सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना जरांगे यांनी या बैठकीत दिल्या. २९ तारखेपर्यंत
मागण्या मान्य केल्या नाही,
तर राज्यातले वृद्ध आमरण उपोषणाला बसतील, तसंच
तीन मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा
असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका
स्पष्ट करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. विधानसभा
अध्यक्षांनी शरद पवार गटातल्या दहा आमदारांना पात्र ठरवल्याच्या निर्णयाला अजित पवार
गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या प्राथमिक सुनावणी
दरम्यान न्यायालयानं,
राज्य विधिमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना ११ मार्चपर्यंत
प्रतिज्ञपत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढची सुनावणी
१४ मार्च ला होणार आहे.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी
३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार
असून, केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याची टीका विधानसभेचे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
****
मुंबईत कुर्ला इथल्या पहिल्या छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या मंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.
राज्य कारभार कसा करावा याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. त्यांची
अर्थनीती, युद्धनीती,
राजनीती अशा नितींवर आज जगभरात अभ्यास होत आहे, त्यांच्या
प्रेरणेतूनच आम्हाला कारभार करायचा असल्याचं, फडणवीस यावेळी म्हणाले. खासदार
पूनम महाजन,
आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी यावेळी उपस्थित
होते.
****
ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं आज नवी
दिल्ली इथं वार्धक्यानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. सर्वोच्च
न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून १९७१ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर १९७२ ते १९७५
या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक
आयोग यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. पद्मविभूषण
आणि पद्मभूषण या नागरी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त
केलं आहे.
****
बहनों और भाईयों अशी साद रेडियोच्या श्रोत्यांना
घालणारे प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं, ते
९१ वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडियो सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या
घराघरात पोहोचला होता. मृदू, प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनाने त्यांनी
रेडियो निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला. बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपटसंगीताचा
कार्यक्रम आकाशवाणीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला. १९५१ मधे रेडीयो निवेदक म्हणून
काम सुरु केल्यापासून सयानी यांनी ५४ हजाराहून अधिक कार्यक्रमांना आणि १९ हजाराहून
जास्त जाहिरातींना आवाज दिला. आकाशवाणी मुंबईमधून त्यांनी कारकिर्दीला प्रारंभ केला
होता. आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एका
कार्यक्रमात आपल्या आवाजाबद्दल अमीन सयानी म्हणाले होते -
बाईट - अमिन सयानी
केंद्र सरकारनं २००९ मधे सयानी यांना पद्मश्री
पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती
आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५
तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद
साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११० वा भाग आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरूवात झाली. त्या
अनुषंगाने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शहरातल्या शिवाजी महाविद्यालय
इथल्या परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातल्या ६९ परीक्षा केंद्रावर
२६ हजार ६०८ परिक्षार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. जिल्ह्यात कॉपीला आळा घालण्यासाठी
कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून, यासाठी विशेष भरारी पथकांची
नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी दिली.
नांदेड जिल्ह्यातही बारावीच्या परीक्षेमध्ये
कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनानं ड्रोन कॅमेराचा
वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना प्रत्यक्ष भेटी
देऊन कॉपी मुक्त अभियनाच्या अंमलबजावणी संदर्भात पाहणी केली.
दरम्यान, नांदेड शहरात पहिल्याच
दिवशी कॉपी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
****
राज्यात हिंगोली, बुलडाणा
आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात भगरीचा प्रसाद खालल्यामुळे जवळपास
७०० जणांना विषबाधा झाली. सर्वांची प्रकृती स्थिर असून जवळच्या रुग्णालयात
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या
रेणापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा
झाली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ
होणं सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल
करण्यात आलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातल्या सोमठाणा
इथं भागवत सप्ताहादरम्यान भगर आणि शेंगदाणा आमटी खाल्ल्यानंतर ३०० जणांना विषबाधा झाली.
नंदुरबार तालुक्यात रणाळे इथं बाळु मामाच्या
भंडाऱ्याच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
महाराष्ट्र शासन आणि पर्यटन आणि सांस्कृतिक
कार्य विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन
करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय
अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, यांच्या
उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. शहरातल्या सांस्कृतिक क्रिडा मंडळ इथं
२६ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना
जिल्हा वार्षिक नियोजनातून चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य आणि कर्जाचं वाटप
आज करण्यात आलं. महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून आणि सक्षम करण्यासाठी पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं पाथर्डी इथं हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका
अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत खासदार डॉ. सुजय
विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
सोलापूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकानं पाच क्विंटल ६४ किलो गांजासह तीन वाहने, मोबाईल असा एक कोटी ३६ लाख ८५
हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातल्या कोंडी आणि मोडनिंब इथं ओरिसा
तसंच आंध्रप्रदेशातून गांजाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला
मिळाली होती. त्यानुसार पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना अटक
करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment