Thursday, 22 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      देशभरातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राज्यघटनेतल्या नियमांना धरूनच निर्णय दिल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण

·      अमृत योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या सहा रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार - खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती

आणि

·      लातूर इथं मराठवाडास्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं उद्या उद्घाटन

****

देशभरातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आगामी साखर हंगामात उसाच्या रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीला ३४० रुपये प्रति क्विंटल या दराने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे ट्विट केलं. या निर्णयामुळे देशातल्या कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्र सरकारनं आयातशुल्क माफ असलेल्या पिवळ्या डाळींच्या आयातीचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार या आधी ही कालमर्यादा केवळ ३१ मार्चपर्यंत होती. देशातल्या सर्वसाधारण डाळींच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. देशात कॅनडा आणि रशियामधून मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटाण्याची आयात केली जाते.

****

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना - मार्डच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासंदर्भात तयार केलेला प्रस्ताव येत्या २५ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पवार यांनी आज सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून  सविस्तर चर्चा करुन, वस्तुस्थितीची माहीती दिली. राज्यातली रुग्णसेवा सुरळीत रहावी,  रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मार्डने आज संध्याकाळपासून सुरू होत असलेला संप मागे घ्यावा, असं आवाहनही पवार यांनी केलं.

****

मुंबईचा समग्र विकास, आर्थिक प्रगती, सुरक्षा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात योगदान देणाऱ्या, १७ मान्यवरांच्या अर्धपुतळ्यांचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज मुंबईत गिरगाव चौपाटी इथं अनावरण केलं. मुंबईकरांना या मान्यवरांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राज्यघटनेतल्या नियमांना धरूनच निर्णय दिला असल्याचं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयानं नार्वेकर आणि शरद पवार गटाच्या दहा आमदारांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आपण दिलेल्या निर्णयात घटनाबाह्य किंवा नियमबाह्य असं काहीही नाही, असं नार्वेकर म्हणाले -

मी जो निर्णय दिलेला आहे, तो घटनेला धरून, घटनेत दिलेल्या तरतुदीनुसार या संदर्भातले सगळे जे नियम आहेत, त्याच्या अनुसार. आणि माझ्या समोर जे पुरावे सादर केले गेले होते, त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय अत्यंत शाश्वत आहे. निर्णय देण्यापाठची कारणं आणि वस्तुस्थिती यासंदर्भात माझ्या निर्णयात पूर्ण त्याचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे माझ्या मते हा लीगली, टेनंबल आणि जस्टीफाईड निर्णय आहे. आणि मला वाटत नाही यांच्यात कुठच्याही प्रकारची घटनाबाह्य अथवा नियमबाह्य किंवा कुठच्याही प्रकारची इल्लीगॅलिटी या निर्णयात दिसते.

****

येत्या २७ आणि २८ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार असून, या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. आज मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीपूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेसची सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

****

खासदार सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांची महाराष्ट्र 'प्रदेश उपाध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पवार यांनी त्यांना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवेश दिला आहे.

****

अमृत योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात नांदेडसह मुदखेड, धर्माबाद, उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. ते आज नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. नांदेड आणि मुदखेड इथल्या रेल्वे स्थानकाची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधां असणाऱ्या नवीन इमारतीचं बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याचं चिखलीकर यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातली १२६ स्थानकं अमृत स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यात सेलू मतदार संघातल्या मोरेगाव - हातनुर - वालूर - कौसडी - बोरी - वसा रस्त्यावरील साडे सतरा किलोमीटर लांबीच्या कामासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज ही माहिती दिली. यासंदर्भात बोर्डीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

****

धाराशिव शहरातल्या १७ किलोमीटर लांबीच्या सर्व्हिस रस्त्यासह त्यावरील पथदिवे, येडशी इथला उड्डाणपूल आणि सिंदफळजवळील लातूररोड जंक्शन उड्डाणपुलासाठी १२२ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचं भूमिपूजन उद्या दुपारी १२ वाजता सिद्धाई मंगल कार्यालयात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर-औसा महामार्गावरील काक्रंबा इथला उड्डाणपूल, तुळजापूर शहर, ताकविकी इथला पर्यायी रस्ता आणि जळकोट इथल्या भुयारी मार्गासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

यवतमाळ इथं येत्या २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असून, पालकमंत्री संजय राठोड यांनी आज या मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहेत. यवतमाळनजीक भारी इथं ४२ एकर खुल्या जागेत हा मेळावा होणार असून, त्यासाठी मैदानात २६ एकर जागेवर भव्य मंडप उभारणीचं काम वेगानं सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली.

****

लातूर इथल्या शासकीय तंत्रनिकेतन समोरील मैदानावर विभागीय मराठवाडास्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं उद्या उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात २०८ खाजगी कंपन्या बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेणार असून, जवळपास १५ हजार युवकांना नोकर्या मिळतील, असा दावा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या मेळाव्यात रोजगारासोबतच युवकांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

****

 

विकसित भारत संकल्प यात्रा आज नवी मुंबईत नेरूळ विभागात दाखल झाली.  सकाळच्या सत्रात सारसोळे गाव इथं या यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये घरगुती शौचालय, पीएम स्वनिधी योजना, आरोग्य तपासणी, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, उज्वला योजना यांचे स्टॉल लावण्यात आले होते. ८० पेक्षा जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला.

****

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकसभा निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

****

अहमदनगर इथं आज महासंस्कृती महोत्सवाच्यानिमितानं शोभा यात्रा काढण्यात आली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं, तसंच कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथातून पौष्टिक तृणधान्याचं महत्व विषद करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या वतीने उद्या आणि परवा चोवीसाव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments: