Thursday, 1 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर, चालू वर्षात वित्तीय तूट ५ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

·      विकसित भारताची हमी देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया, तर अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी काहीच नाही - विरोधकांची टीका

·      शिधापत्रिकेवर साखरेच्या वितरणाला आणखी दोन वर्ष मुदतवाढ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं गॅस टँकरच्या अपघातानंतर परिस्थिती नियंत्रणात

****

युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. यंदाच्या वर्षात ३० लाख ८० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून, ४७ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. यातला २६ लाख दोन हजार कोटी महसूल, करातून मिळेल. या वर्षात वित्तीय तूट ५ पूर्णांक १ दशांश टक्के तर महसुली तूट साडेचार टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी सर्वाधिक ६ लाख २० हजार कोटी रुपये तरतूद केली असून, त्या खालोखाल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी २ लाख ७८ हजार कोटी, रेल्वे साठी २ लाख ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागासाठी २ लाख १३ हजार कोटी रुपयांची तरतूद असून, ग्रामविकास विभागासाठी एक लाख ७७ हजार कोटी रुपये तर शेती आणि शेतकरी कल्याण विभागासाठी १ लाख २७ हजार कोटी रुपये तरतूद आहे. रेल्वेचे ४० हजार डबे वंदे भारत डब्यांमधे रुपांतरित करण्यात येणार आहेत. 'उडान योजने' अंतर्गत ५१७ नवे मार्ग सुरु झाले असून, देशभरात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे.

पायाभूत सुविधा विकासाची तरतूद ११ टक्के वाढवून ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये करण्यात आली आहे. 'लखपती दीदी योजनेचा' लाभ ३ कोटी महिलांपर्यंत पोहचवण्याचं उद्दिष्ट आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाची लस ९ ते १४ वयोगटाच्या मुलींना देण्याची मोहीम, तसंच 'आयुष्मान भारत योजनेचा', सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना लाभ या घोषणा अर्थसंकल्पात केल्या आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण प्रकल्प, पर्यावरणस्नेही शाश्वत विकासावर भर, छतावर सौरउर्जा निर्मितीला प्रोत्साहन, सौर ऊर्जा निर्मितीसाठी संयंत्र बसवणाऱ्या कुटुंबांना '३०० एकक' मोफत वीज अशा विविध तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत.

राज्य सरकारांना ७५ हजार कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला. गेल्या १० वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला. कोविड महामारी, आंतरराष्ट्रीय भूराजकीय संघर्ष आणि इतर आव्हानांचा सामना सरकारनं 'सबका साथ सबका प्रयास सबका विकास' या मंत्राच्या आधारे केला आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली, असं त्या म्हणाल्या.

आगामी आर्थिक वर्षासाठी कररचनेत कोणताही बदल अर्थसंकल्पात सुचवलेला नाही. मात्र स्टार्टअप उद्योगांना दिलेल्या करविषयक सवलतींची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. त्यानंतर संसदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

हा विकसित भारताची हमी देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, हा अर्थसंकल्प उद्योग व्यवसाय आणि निर्यातीला चालना देणारा असून, रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणारा असल्याचं म्हटलं आहे.

लोककल्याण हे सूत्र लक्षात घेऊन या वर्षीचा अंर्थसंकल्प सादर झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी व्यक्त केली आहे.

महिला आणि सर्वसामान्य जनतेचा विचार या अर्थसंकल्पात केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे -

या बजेट मध्ये जर पाहिलं तर मुलींना देखील प्राधान्य दिलंय. महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. एक कोटीचे तीन कोटी महिला सक्षम करणे, लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घरांचं टार्गेट होतं दोन कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे असं मी याठिकाणी म्हणेन.

 

विकासाची दिशा सांगणारा, पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालिन अर्थसंकल्पातून येईल, हा आत्मविश्वास या अर्थसंकल्पातून मिळतो, असं त्यांनी नमूद केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, हा अर्थसंकल्प देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा असल्याचं म्हटलं आहे.

****

या अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी काहीच नाही अशा शब्दात विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी तुटी बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

****

विकासाचा आभास निर्माण करणारा तसचं विकसित भारताचं दिवास्वप्न दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

****

कृषी क्षेत्राची घसरण थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा होती, मात्र अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या उपाययोजना करण्यात न आल्यानं शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असल्याची टीका, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे.

****

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकेवर साखरेच्या वितरणाला आणखी दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत शिधापत्रिकेवर साखर मिळेल.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जालना रोडवर गॅस टँकरच्या अपघातानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. आज सकाळच्या सुमारास सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस टँकर दुभाजकाला धडकल्यानं गॅस गळती सुरू झाली होती, अग्निशमन दलाच्या सहा बंबांमार्फत अपघातस्थळी पाण्याचा मारा करण्यात आला. दुपारच्या सुमारास उर्वरित गॅस दुसर्या टँकरमध्ये भरण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. प्रशासनानं या परिसरात जमावबंदी लागू केली असून, अपघाताच्या ठिकाणापासून पाचशे ते सहाशे मीटर परिसरातील नागरिकांना घराबाहेर सुरक्षितस्थळी पडण्याचं आवाहन केलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात पेण इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद कार्यक्रम घेतला. आमची लढाई भाजप विरुद्ध विरोधक अशी नाही, तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

****

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. या वैद्यकीय सहाय्यता निधीचा गैरउपयोग होऊ नये, यासाठी एका पथकाद्वारे राज्यभरातल्या रुग्णालयांमध्ये अचानक भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. यासंबंधी कुठल्याही रुग्णालयात अनुचित प्रकार आढळल्यास रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरु असलेलं सर्वेक्षण परभणी जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आल्याचं आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितलं. परभणी शहरात आतापर्यंत ६२ हजार ४१५ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या कुटुंबांचं सर्वेक्षण झालेलं नाही, अशा कुटुंब प्रमुखांनी आपल्या प्रभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलं आहे.

****

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा २६ जानेवारीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करत आज हिंगोली इथं ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

No comments: