Thursday, 1 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 01.02.2024, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 01 February 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार

·      अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य - अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी पूर्ण

·      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास राज्य सरकारची मंजुरी

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सकाळी ११ वाजता वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन अर्थमंत्री म्हणून सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, सध्याच्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल.

****

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. नव्या संसद भवनात एक भारत श्रेष्ठ भारताची अनुभूती होत असून, या भवनात सार्थ संवाद होण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या निर्मितीसह अनेक क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात सरकारने पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं, अयोध्येतल्या राम मंदीराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं.

****

दरम्यान, राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण व्यापक, आणि अंतर्मुख करणारं तसंच १४० कोटी भारतीयांच्या एकजुटीचं बळ दाखवणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर हे अभिभाषण दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

****

दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत सादर केल्यावर संसदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यापूर्वी राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सतनामसिंह संधू, आम आदमी पार्टीच्या स्वाती मालिवाल, तसंच नारायण दास गुप्ता यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती जगदीप धनखड यांनी १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची घोषणा केली.

****

मोबाईल फोनच्या विविध भागांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे. या सर्व साहित्यावर आता पंधरा ऐवजी दहा टक्के आयात शुल्क आकारलं जाईल. मोबाईल फोनच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय या तळघरात नियमित पूजा करत, सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवाल अजित पवार गटानं या सुनावणीत उपस्थित केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

****

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

राज्यातल्या विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी, बृहन्मुंबईचे अपर पोलिस आयुक्त वीरेंद्र यांची, तर परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली झाली आहे. बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालन्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

सनदी अधिकाऱ्यांच्याही काल बदल्या करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोच्या प्रशासक पदी, तर बीड इथल्या सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांची, पालघर इथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

राज्यशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर तसंच डिसेंबर महिन्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातले रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पॅट स्कॅन करण आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.

****

चेन्नई इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५७ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकं पटकावली. त्या खालोखाल ३८ सुवर्ण पदकांसह ९८ पदकं मिळवून तामिळनाडूनं दुसरं, तर ३५ सुवर्ण पदकांसह १०३ पदकं जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत काल या स्पर्धेचा समारोप झाला.

****

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते काल लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचं काम प्रगणकांनी विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

****

नवीन धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना आजपासून स्वस्त दरानं वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नागरिकांना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या वाळू डेपो वरून प्रति ब्रास ६०० रुपये आणि इतर कर ७७ रुपये याप्रमाणे ऑनलाइन प्रणालीद्वारे वाळू विक्री करण्यात येणार आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असंही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

****

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि किनवट ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्ह्यातल्या बोधडी इथं हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्तासुरक्षा विषयक मार्गदर्शन करुन माहिती पुस्तिकेचं वाटप केलं.

****

समाज माध्यमांवर मिळणाऱ्या कर्जमाफीच्या आमिषांपासून सावध राहण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. यासंबंधी गैरप्रकार आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसचं अनधिकृत कर्जमाफी मोहिमांबाबत सावधानता बाळगण्याचं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलं असल्याचं ते म्हणाले.

****

No comments: