Friday, 2 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.02.2024, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 02 February 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब हे घटक केंद्रस्थानी असलेला हंगामी अर्थसंकल्प सादर

·      स्टार्टअपसाठीच्या सवलतींना एक वर्ष मुदवाढ तर सर्वसामान्य कररचना जैसे थे

·      पायाभूत सुविधांच्या तरतुदीत ११ टक्के वाढ;महाराष्ट्रातल्या रेल्वेप्रकल्पांसाठी सुमारे साडे १५ हजार कोटी रुपये तरतूद

आणि

·      ९७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसंच वेरुळ अजिंठा महोत्सवाला आजपासून प्रारंभ

****

महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब या घटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत सादर केला. यंदाच्या वर्षात ३० लाख ८० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून, ४७ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. यातला २६ लाख दोन हजार कोटी महसूल, करातून मिळेल. या वर्षात वित्तीय तूट ५ पूर्णांक १ दशांश टक्के तर महसुली तूट साडेचार टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी सर्वाधिक ६ लाख २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी २ लाख ७८ हजार कोटी, रेल्वे - २ लाख ५५ हजार कोटी, अन्न आणि नागरी पुरवठा - लाख १३ हजार कोटी, ग्रामविकास - एक लाख ७७ हजार कोटी रुपये तर शेती आणि शेतकरी कल्याण विभागासाठी १ लाख २७ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधा विकासाची तरतूद ११ टक्के वाढवून ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये करण्यात आली आहे. लखपती दीदी योजनेचालाभ ३ कोटी महिलांपर्यंत पोहचवण्याचं उद्दिष्ट, ९ ते १४ वयोगटाच्या मुलींसाठी गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण, ‘आयुष्मान भारत योजनेचा’, सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना लाभ, मध्यम उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण प्रकल्प, पर्यावरणस्नेही शाश्वत विकासावर भर, छतावर सौरउर्जा निर्मितीला प्रोत्साहन, सौर ऊर्जा निर्मितीसाठी संयंत्र बसवणाऱ्या कुटुंबांना ३०० एककमोफत वीज अशा विविध तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. राज्य सरकारांना ७५ हजार कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला.

आगामी आर्थिक वर्षासाठी कररचनेत कोणताही बदल अर्थसंकल्पात सुचवलेला नाही. मात्र स्टार्टअप उद्योगांना दिलेल्या करविषयक सवलतींची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. त्यानंतर संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

महाराष्ट्रातल्या रेल्वेप्रकल्पांसाठी अर्थमंत्र्यांनी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामध्ये राज्यातल्या तेराशे रेल्वेस्थानकांचं अमृत भारत स्टेशन अंतर्गत अद्ययावतीकरण केलं जाणार आहे. राज्यातल्या ९८ टक्के रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मराठवाड्यात रेल्वेच्या प्रलंबित विकासकामांसाठी एक हजार ८०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानकं उभारली जाणार आहेत.

छत्रपती संभाजीनग - मनमाड रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी २१४ कोटी, परभणी - परळी दुहेरीकरणासाठी १०० कोटी, लातूर रोड बायपास आणि परळी बायपाससाठी प्रत्येकी ४० कोटी, अकोला-पूर्णा-नांदेड-ढोण रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी २१९ कोटी रुपयांची तरतूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हा विकासित भारताची हमी देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

लोककल्याण हे सूत्र लक्षात घेऊन या वर्षीचा अंर्थसंकल्प सादर झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत करताना, महिला आणि सर्वसामान्य जनतेचा विचार या अर्थसंकल्पात केल्याचं म्हटलं आहे.

****

या अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी काहीच नाही अशा शब्दात विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी अर्थसंकल्पातल्या तुटी बद्दल चिंता व्यक्त केली.

विकासाचा आभास निर्माण करण्याचा तसचं विकसित भारताचं दिवास्वप्न दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पातू केल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

****

कृषी क्षेत्रासाठी कोणत्याही नव्या उपाययोजना करण्यात न आल्यानं शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असल्याची टीका, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे.

****

राज्यात पी.एम. विश्वकर्मा योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल पीएम विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातल्या १०१ केंद्रांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात जालना रोडवर गॅसगळतीमुळे बंद ठेवलेली वाहतुक काल संध्याकाळनंतर पूर्ववत झाली. महावितरणने बाधित परिसरात बंद केलेला वीजपुरवठाही सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. काल सकाळी सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस टँकर दुभाजकाला धडकल्यानं गॅस गळती सुरू झाली होती, अग्निशमन दलाच्या अनेक बंबांमार्फत अपघातस्थळी पाण्याचा मारा करण्यात आला. दुपारच्या सुमारास उर्वरित गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. हा प्रसंग कुशलतेने हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी सायंकाळी सत्कार केला

****

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं आज ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडी निघणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचं उद्घाटन होईल.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सोनेरी महल परिसरात होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पर्यटन मंत्री गिरी महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. आज या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचं भरतनाट्यम्, पंडिता अनुराधा पाल यांचं स्त्री शक्तीवर आधारित पाच वाद्यांचं सादरीकरण आणि राहुल देशपांडे तसंच प्रियंका बर्वे यांचं गायन होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनतर्फे देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. २०२३ सालचा सेवा क्षेत्रासाठीचा पुरस्कार धाराशिवचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांना, सांस्कृतिक क्षेत्रासाठी डॉ. अरुणा लोखंडे यांना जाहीर झाला आहे. २०२४ सालचा सेवा क्षेत्रासाठीचा पुरस्कार सहकार आणि समाजकार्यातले ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद गोरे यांना, तर सांस्कृतिक क्षेत्रासाठी नाटककार दत्ता भगत यांना जाहीर झाला आहे. रोख ५० हजारे रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. यासंबंधी कुठल्याही रुग्णालयात अनुचित प्रकार आढळल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

परभणी इथं सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सला काल संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे संदलचा तबक डोक्यावर घेवून या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या यात्रेला राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

****

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरु असलेलं सर्वेक्षण परभणी जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आल्याचं आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितलं. परभणी शहरात आतापर्यंत ६२ हजार ४१५ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

****

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा २६ जानेवारीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करत काल हिंगोली इथं ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आलं. 

****

वाढती महागाई, शेतमालास मिळत नसलेला योग्य दर आणि आमदार रोहीत पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. जालना, हिंगोली इथंही आंदोलन करुन, प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या झरी इथं कंटेनर आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

****

No comments: