Thursday, 22 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.02.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 February 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला मतदारसंघ वाराणसीचा दौरा करणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान काशी इथं १३ हजार कोटींहून अधिक खर्चांच्या विकासकामांचा शुभारंभ करतील. पंतप्रधान उद्या काशी संकुल दुग्ध प्रसंस्करण केंद्राचं  उद्घघाटन करतील. त्यांच्या हस्ते कृषी पार्क कारखियाव इथं विविध पायाभूत आराखड्यांच्या विकासकामांचा शुभारंभ तसंच विणकरांसाठी रेशम प्रिंटींग सुविधेचा शुभारंभ होईल.पंतप्रधान वाराणसी इथं राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिकी संस्था निफ्ट चं कोनशिला अनावरण आणि बनारस हिंदू विद्यापीठात राष्ट्रीय वार्धक्य केंद्राच्या कामाचं कोनशिला अनावरणही देखिल करणार आहेत.

****

कोपराच्या सांधेदुखीनं त्रस्त आणि मर्यादीत हालचाल होत असलेल्या रुग्णांसाठी कोपर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक सुलभ, अचूक आणि उच्चगुणवत्तापूर्ण व्हावी, या उद्देशानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स आणि भारतीय प्रौद्योगिकी संस्था दिल्ली यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कोपर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सोपी आणि उच्च गुणवत्तेची व्हावी यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हाही यामागचा उद्देश आहे. रुग्णांना कमी खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्नरत असल्याचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर भावुक गर्ग यांनी सांगितलं. कोपर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीचा सामंजस्य करार रुग्णांसाठी आशेचा किरण मानला जात आहे.

****

कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकासंदर्भात दोन हजार हरकती आणि सूचना मिळाल्या असून हे विधेयक शेतकरी तसंच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक नसेल, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. अप्रमाणित, भेसळयुक्त, बनावट बियाणं, कीटकनाशकं या पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त, संयुक्त समितीच्या तिसऱ्या बैठकीत काल ते बोलत होते. बोगस आणि बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशनात, या कायद्यामध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयकं सादर करण्यात आली होती.

****

धाराशिव शहरातील १७ किलोमीटर लांबीच्या सर्व्हिस रस्त्यासह त्यावरील पथदिवे, येडशी इथला उड्डाणपूल आणि सिंदफळजवळील लातूररोड जंक्शन उड्डाणपुलासाठी १२२ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कामांचं भूमिपूजन उद्या दुपारी १२ वाजता सिद्धाई मंगल कार्यालयात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

तुळजापूर-औसा महामार्गावरील काक्रंबा इथला उड्डाणपूल, तुळजापूर शहर, ताकविकी इथला

पर्यायी रस्ता आणि जळकोट इथल्या भुयारी मार्गासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यभरातून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या ग्रामीण क्षेत्रात १४ लाख ६१ हजार पात्र लाभार्थी असून, ग्रामीण भागात ९२ टक्के काम पूर्ण झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल, भूदरगढ आणि चंदगड या तालुक्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.

****

धुळे जिल्हा परिषदेच्या दोन विषय समित्यांचं सभापती पद रिक्त झालं आहे, त्यामुळं जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी दोन विषय समित्यांच्या सभापती पदांपैकी महिला आणि बाल कल्याण समिती सभापती पदाच्या निवडीसाठी येत्या एक मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेकरीता धुळ्याचे उपविभागीय अधिकारी हे पिठासीन अधिकारी तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सहायक पिठासीन अधिकारी असतील.

****

पुणे खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत आज भारतच्या सुमीत नागलचा सामना भारताच्याच निकी कालियांदा पुनाचाशी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा सामना सुरु होईल. बत्तीसाव्या फेरीत सुमीत नागलनं तैवानच्या के यु हिस्यु चा पराभव केला तर पुनाचानं पोर्तुगालच्या गोनकालो अलिवियेराचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांच्या दुसऱ्या लढतीत भारताच्या के आर रामनाथन आणि रशियाच्या एलिक्सिस जाकारोव यांच्यात सामना होईल.

****

No comments: