Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· २०२४-२५ च्या साखर हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर ३४० रुपये प्रति क्विंटल मंजूर
· विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
· राज्यातल्या सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध
· ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन, तसंच प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं निधन
आणि
· हिंगोली, बुलडाणा आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात जवळपास ७०० जणांना प्रसादातून विषबाधा
सविस्तर बातम्या
केंद्र सरकारने २०२४-२५ च्या साखर हंगामासाठी साखर कारखान्यांकडून देय असलेला उसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी ३४० रुपये प्रति क्विंटल या दराने मंजूर केला आहे. नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ही माहिती दिली. २०२३-२४ या वर्षात उसाचा एफआरपी ३१५ रुपये प्रति क्विंटल होता, तो आता ३४० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. सुधारित एफआरपी यावर्षी एक ऑक्टोबरपासून लागू होईल.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या अंब्रेला योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्याच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला, केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या अंतर्गत महिलांसाठी २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन सेवा ११२ चा विस्तार केला जाईल.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिल्यानंतर, शरद पवार गटाचे आमदार आपोआपच अपात्र ठरतात, असा दावा करणारी याचिका अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी दाखल केली आहे. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिर्दोस पूनावाला यांच्या खंडपीठानं, राज्य विधिमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना ११ मार्चपर्यंत प्रतिज्ञपत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढची सुनावणी १४ मार्च ला होणार आहे.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव राज्यभरात येत्या २४ तारखेपासून प्रत्येक गावात रोज सकाळी साडे दहा वाजता एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक मंजूर झाल्यानंतरही आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं काल झालेल्या बैठकीत त्यांनी पुढच्या आंदोनलाचा कार्यक्रम जाहीर केला. सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात येत असून, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना जरांगे यांनी दिल्या. २९ तारखेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर राज्यातले वृद्ध आमरण उपोषणाला बसतील, तसंच तीन मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत विविध शेतकरी संघटनांची काल बैठक झाली. तीन दिवसांपूर्वीच शासनानं कांदा निर्यात बंदी उठवल्याचं जाहीर केलं होतं, मात्र, पुन्हा कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम असल्याचं सांगितलं. या निर्णयाविरोधात नाशिक इथूनच आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं संघटनांनी यावेळी जाहीर केलं.
****
पणन महासंघ शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवत असून, महासंघाने शेतकरी आणि ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवला असल्याचं, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महासंघाच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतमालाला चांगला आणि योग्य भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य, तेलबिया, कडधान्य यांची आधारभूत किंमतीने राज्यात खरेदी, तसंच सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध खत पुरवठा करण्याचं काम यशस्वीपणे पार पाडत असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या १०० महाविद्यालयांमध्ये येत्या चार मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक- युवतींनी घ्यावा, असं आवाहन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी केलं. मुंबईत कौशल्य विकास कार्यशाळेत काल त्या बोलत होत्या.
****
राज्यातल्या सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी, एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल.
****
ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं काल नवी दिल्ली इथं वार्धक्यानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून १९७१ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर १९७२ ते १९७५ या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं होतं.
****
बहनों और भाईयों अशी साद रेडियोच्या श्रोत्यांना घालणारे प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं काल मुंबईत हृदयविकारानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडियो सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या घराघरात पोहोचला होता. बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपटसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला. १९५१ मध्ये रेडीयो निवेदक म्हणून काम सुरु केल्यापासून सयानी यांनी ५४ हजाराहून अधिक कार्यक्रमांना आणि १९ हजाराहून जास्त जाहिरातींना आवाज दिला. केंद्र सरकारनं २००९ मधे सयानी यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
****
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल मुंबईत पक्षाचे कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केलं. आज एकीकडे मोदींच्या विकासाचा मार्ग आहे तर दुसरीकडे घराणेशाहीची, भ्रष्टाचाराची, खटल्यात अडकलेल्यांची इंडीया आघाडी असल्याची टीका, त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे खासदार, आमदार या मेळाव्याला उपस्थित होते.
****
राज्यात हिंगोली, बुलडाणा आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात भगरीचा प्रसाद खालल्यामुळे जवळपास ७०० जणांना विषबाधा झाली. सर्वांची प्रकृती स्थिर असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रेणापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणं सुरू झाल्यामुळे रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातल्या सोमठाणा इथं, तर नंदुरबार तालुक्यात रणाळे इथं बाळु मामाच्या भंडाऱ्याच्या प्रसादातून भक्तांना विषबाधा झाली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना कालपासून सुरूवात झाली. त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून, यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातही बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनानं ड्रोन कॅमेराचा वापर केलं. दरम्यान, नांदेड शहरात काल पहिल्याच दिवशी कॉपी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गोविंद सन्मान’ ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना काल जाहीर झाला. पुरस्काराचं हे दहावं वर्ष आहे. शाल, सन्मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या २८ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं ‘गोविंद देशपांडे स्मृति सोहळ्यात’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र शासन आणि पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, यांच्या उपस्थितीत होणार आहे. शहरातल्या सांस्कृतिक क्रिडा मंडळ इथं २६ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment