Friday, 23 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.02.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 February 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      शेतकरी हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्तीसाठी सरकार कटिबद्ध-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकारानं निधन

·      राज्य शासनाचे महाराष्ट्र भूषण तसंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान

·      'नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात १२ हजार जणांना लाभ

आणि

·      लातूर इथं आज विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन

 

सविस्तर बातम्या

शेतकरी हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्तीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल एका ट्विट संदेशातून पंतप्रधानांनी हा निर्धार व्यक्त केला. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीला ३४० रुपये प्रति क्विंटल या दराने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे ट्विट केलं. या निर्णयामुळे देशातल्या कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान येत्या येत्या २८ तारखेला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काल या मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

****

लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. जोशी यांना २१ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांना मुंबईत हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचं निधन झालं. 

शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत मनोहर जोशी यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. शिवसेना - भाजप युती सरकारमध्ये १९९५ ते १९९९ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. १९९९ ते २००२ या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्री होते, तर २००२ ते २००४ या काळात लोकसभेचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं. जोशी यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. जोशी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

वैद्यकीय महाविद्यालयांनी देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान प्रणालीचा अवलंब करण्याची अशा सूचना, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते काल यासंदर्भात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात नेत्र आणि त्वचा स्वीकारण्यासाठी केंद्र उभारावं, तसंच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अवयव दान कार्यकारिणी समिती नेमावी, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले.

****

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभं राहावं, यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

****


 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालं आहे. यासंदर्भातला आदेश निवडणूक आयोगानं काल जारी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातल्या आगामी सर्व निवडणुकांसाठी शरद पवार गटाला हे पक्षचिन्ह असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राज्यघटनेतल्या नियमांना धरूनच निर्णय दिला असल्याचं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयानं नार्वेकर आणि शरद पवार गटाच्या दहा आमदारांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

****

येत्या २७ आणि २८ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार असून, या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. काल मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीपूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेसची सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असल्याचं, चेन्निथला यांनी सांगितलं.

****

खासदार सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांची महाराष्ट्र 'प्रदेश उपाध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल संध्याकाळपासून संप सुरू केला. सरकारकडून लेखी आश्वासन प्राप्त झालेलं नाही, असं सांगून हा संप पुकारल्याचं संपकऱ्यांचं म्हणणं आहे. विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ आणि वसतीगृहाच्या सोयी-सुविधांसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयातल्या चार पोर्टल्सचं लोकार्पण केलं. या पोर्टल्समुळे मंत्रालयाच्या अंतर्गत विभागांचं कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल, असं ठाकूर यांनी सांगितलं

****

लातूर इथल्या शासकीय तंत्रनिकेतन समोरील मैदानावर विभागीय मराठवाडास्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आज उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात २०८ खाजगी कंपन्या बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेणार असून, जवळपास १५ हजार युवकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या मेळाव्यात रोजगारासोबतच युवकांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राज्याचा पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झालं. शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.

हिंगोली इथं देखील महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आमदार संतोष बांगर, आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात भारुड, पोवाडा आदीसह, कुस्ती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

****

देशातल्या १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातल्या निरक्षर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पायाभूत साक्षर करून त्यांचं संख्याज्ञान विकसित करणं, त्यांच्यात महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने 'नवभारत साक्षरता कार्यक्रम'  हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात १२ हजार २१५ जण साक्षर होणार आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

 

हिंगोली जिल्ह्यात 12 हजार 215  निरक्षरांचा शोध घेतला आहे. सध्या 8 हजार 50 निरक्षरांची नोंद करण्यात आली आहे.  15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना प्रथम या अभियानात सामावून घेतले जात आहे. जिल्ह्यात 801 स्वयंसेवकांची या कामासाठी नोंद झाली आहे.  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या नवभारत साक्षरता कार्यक्रमास पहिल्याच टप्प्यात हिंगोली जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. 

****

अमृत योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात नांदेडसह मुदखेड, धर्माबाद, उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यातली १२६ स्थानकं  अमृत स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा इथं काल आद्या हिरकणी महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते झालं. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्तम वस्तू आणि पदार्थांचं उत्पादन करून स्मार्ट मार्केटिंग करावं, असं आवाहन घोष यांनी केलं. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात १०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

****

गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ रथांच्या माध्यमातून जलजागृती करण्यात येत आहे. या नऊ जल रथांना काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. मिटमिटा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव मेळाव्यासह शहरात विविध कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत. गंगापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या होणार आहे.

****


नांदेड इथं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने काल गुरुद्वारा परिसरातल्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. गुरुद्वाराचं प्रवेशद्वार क्रमांक एक ते लंगरसाहिब पर्यंतच्या मार्गावर असलेले किरकोळ व्यापारी आणि इतर अतिक्रमण धारकांवर कारवाई करून रहदारीस ही जागा मोकळी करून करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात सेलू मतदार संघातल्या मोरेगाव - हातनुर - वालूर - कौसडी - बोरी - वसा रस्त्यावरील साडे सतरा किलोमीटर लांबीच्या कामासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

****

No comments: