Friday, 22 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:22.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेला आम आदमी पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र केजरीवाल यांनी ही याचिका मागे घेतली आहे. उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु असल्यानं, सवोच्च न्यायालयातली याचिका मागे घेतल्याची माहिती, ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.

****

दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी निदर्शनं केली. या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - पत्यारोप सुरु आहेत. केजरीवाल यांना चुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचं, आप च्या नेत्या आतिषी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असून, काँग्रेस केजरीवाल यांच्योसबत असल्याचं, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. तर भाजप नेते संबित पात्रा यांनी, केजरीवाल यांच्या चौकशीला सामोरं न जाण्यावर टीका केली. त्यांनी ईडीच्या समन्सचा आदर करायला पाहिजे होता, असं पात्रा यांनी म्हटलं आहे.   

****


जागतिक जल दिन आज साजरा होत आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जल दिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.

जलदिनानिमित्त पाण्याचं महत्व सांगणारी ध्वनिचित्रफित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जारी केली आहे. पाणी आपला महत्वाचा स्रोत असून, सर्वांनी पाण्याचं संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

जलदिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलसाक्षरता फेरी काढण्यात आली. यावेळेस जलसाक्षरतेबाबत विविध घोषणा देण्यात आल्या. या फेरीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक तसचं सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

****

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून, महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. मात्र ठाकरे गटानं या मतदारसंघावर दावा केला असून, राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नितीन देशमुख यांनी काल ही माहिती दिली.

****

गडचिरोली पोलिसांनी काल खून आणि जाळपोळ अशा हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकाला अटक केली. पेका मादी पुंगाटी असं त्याचं नाव असून, तो भामरागड तालुक्यातल्या मिळगुडवंचा इथला रहिवासी आहे. त्याच्यावर दीड लाखाचं बक्षिस होतं. पोलिसांचं जलद प्रतिसाद पथक आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान भामरागड तालुक्यातल्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना त्याला अटक करण्यात आली. नक्षल्यांना रेशन पुरवणं, त्यांची पत्रकं टाकणं, नक्षल्यांच्या बैठकीसाठी गावकऱ्यांना बोलावणं, आदी कामं तो करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा पोलीस चेकपोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीच्या विरोधात पोलिसांनी काल कारवाई केली. या कारवाईत १९ लाख ५४ हजार ५६० रुपये किमतीची दारू आणि  १० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २९ लाख ५४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंध्र प्रदेश इथल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. 

****

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि परभणी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवचरित्रावर आधारित शिवगर्जनाया महानाट्याचं परभणी इथल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलावर आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत काल या महानाट्याची सुरुवात करण्यात आली. या नाटकाला नागरीकांच उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आज सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. रात्री आठ वाजता चेन्नईतल्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरु होईल.

दरम्यान, आयपीएल मधल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी ऐवजी फलंदाज ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे.

****

No comments: