आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आम आदमी पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
****
जागतिक जल दिन आज साजरा होत आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जल दिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.
यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलसाक्षरता फेरी काढण्यात आली होती. यावेळेस जलसाक्षरतेबाबत विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या फेरीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
****
केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाअंतर्गत फॅक्टचेक कक्ष स्थापन करणाऱ्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत अधिसूचनेला स्थगिती दिली.
****
समाजमाध्यमांवर कार्यरत असलेल्या प्रभावशाली व्यक्तींनी परदेशी ऑनलाईन बेटिंग किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती करु नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहेत. ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराच्या ग्राहकांमध्ये आणि खास करुन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेल्या सामाजिक आर्थिक गुंतागुतीमुळे या सूचना करण्यात आल्या आहेत.
****
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या भिवंडी जवळच्या बोरिवली-पडघा इथल्या शाखेला उद्ध्वस्त केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं तिघांविरोधात काल नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. देशविरोधी कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
****
टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल हा पॅरिसमध्ये यावर्षी होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघाटनेनं काल याबाबत घोषणा केली. मुष्टियोद्धापटू मेरी कोम पथकाची प्रमुख असेल, तर लुग या खेळातील खेळाडू सिवा केशव उपप्रमुख असेल.
****
No comments:
Post a Comment