Tuesday, 23 April 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस

·      महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचाराला वेग

·      जालना मतदार संघातून महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आणि

·      हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षांचे दिग्गज नेते आणि स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आहेत.

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शहा यांची उद्या अमरावती मध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. भाजप नेते, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होत आहे.

सांगली इथे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात दहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ९६ मतदारसंघात येत्या १३ मे ला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.

****

जालना लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. या मतदारसंघात आत्तापर्यंत १० उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. आज एकूण ११ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली तर आजपर्यंत ८८ जणांनी २१० उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज दिवसभरामध्ये अकरा उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर केले. यामध्ये भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र भास्कर बोडखे, बहुजन महा पार्टीच्या उमेदवार मनीषा उर्फ मंदा खरात, आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत या मतदार संघात १९ जणांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत.

 

बीड इथून आज पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासह १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या मतदार संघातून आज चौदा उमेदवारांनी पस्तीस अर्ज घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत फेरविचार करणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज भुजबळ यांना उमेदवारीचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी करण गायकर यांना, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

नागपूर मतदार संघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारफेरीत शालेय विद्यार्थ्यांना सहभागी केल्याप्रकरणी संबंधित शाळा संचालकांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात नागपूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. दरम्यान, या प्रकरणात गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

****

राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर, माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधांची जाहिरात प्रसिद्ध केल्या प्रकरणी पतंजलीनं दाखल केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज तिसऱ्यांदा फेटाळला. न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना येत्या ३० एप्रिलला व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या इतर कंपन्यांविरोधात केंद्रसरकारनं आतापर्यंत कोणती कारवाई केली, असा प्रश्नही न्यायालयानं विचारला आहे. रुग्णांना हेतुपूर्वक महाग औषधं लिहून देणाऱ्या ॲलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं करावी, अशी सूचनाही न्यायालयानं केली.

****

दिल्लीच्या कथित मद्यघोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अकरा एप्रिलपासून अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के.कविता यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं येत्या सात मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केंद्रीय अन्वेषण संस्था - सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.

याच प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं सात मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यानंतर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केजरीवाल यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.

****

हनुमान जन्मोत्सव आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सुपारी हनुमान तसंच जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरांसह ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

मुंबईच्या जुहू चौपाटीवर हनुमान जयंतीनिमित्त वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी हनुमानाची दहा फूट उंच प्रतिकृती साकारली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची प्राचीन परंपरा आजही पाळण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातही हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं, तसंच जागोजागी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या रविवारपासून सुरू असलेल्या चैत्र पौर्णिमा यात्रेत आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

****

धुळे शहरातल्या श्री एकवीरा देवी यात्रा उत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीनं या मंदिरालगत उभारण्यात आलेल्या मतदान जनजागृती कक्ष आणि मदत केंद्राचं आज धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.

****

वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज वाशीम शहरात दीड किलोमीटर अंतराच्या मानवी साखळीतून मतदार जागृती करण्यात आली. या मानवी साखळीमध्ये जिल्हा प्रशासनातल्या दोन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध शाळांचे विद्यार्थी, सामाजिक संघटना, लोककलावंत आणि स्थानिक सहभागी झाले होते.

****

धाराशिव इथं आज मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली तसंच आणि पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केलं. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सायकल फेरीनं संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेलं भावनिक पत्र, तसंच विद्यार्थ्यांची मानवी साखळी, पथनाट्य, आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे.

****

लोकसभा निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते.

****

हुजूर साहिब नांदेड - रायचूर- हुजूर साहिब नांदेड ही एक्सप्रेस गाडी येत्या सव्वीस मे पर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, नांदेड -हजरत निजामुद्दीन दिल्ली या विशेष गाडीला ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

No comments: