आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनमध्ये टाकण्यात आलेल्या व्हिव्हीपॅटच्या मतदानपत्रिकांबाबत शंभर टक्के खातरजमा करण्यासंबंधीच्या याचिकांवरची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरु होत आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांचं पीठ निवडणूक आणि राजकीय सुधारणांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या तसंच अन्य याचिकांवर सुनावणी करेल. याच आठवड्यात गेल्या मंगळवारी यासंदर्भात झालेल्या सुनावणीत ईव्हीएम मशिन चांगले परिणाम देत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
***
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह, नंदूरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. २५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून, २६ एप्रिलला अर्जांची छाननी तर २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. या सर्व मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
***
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात एकूण १७ राज्यांमध्ये तसचं ४ केंद्रशासित प्रदेशामध्य १०२ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. या पाच मतदारसंघांसह देशभरातील १०२ मतदारसंघातील प्रचार काल सायंकाळी पाच वाजता थांबला.
***
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर काल चारचाकी उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. चिखली इथलं देशमूख कुटुंब जालन्याकडं जात असताना हा अपघात झाला.
***
No comments:
Post a Comment