Wednesday, 1 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.05.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 May 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला वेग;उस्मानाबाद आणि लातूरच्या सभेत भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर कडाडून टीका;महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर   

·      पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग;नाशिकचा दावा सोडल्याचं भाजपकडून जाहीर

·      लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांत उद्यापासून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृह मतदान

आणि

·      महाराष्ट्र राज्याचा आज पासष्टावा स्थापना दिन;ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या सात तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक रॅली, बैठका, प्रचारसभा घेत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लातूर तसंच उस्मानाबाद इथं महायुतीचे उमेदवार अनुक्रमे सुधाकर श्रृंगारे आणि अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली. शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाची प्रगती आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. राठवाडा वॉटर ग्रीड योजना आणि एकूणच पाणी प्रश्नासह विविध मुद्यांवरून त्यांनी यावेळी विरोधकांवर प्रामुख्याने काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान, धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत २५ एकर क्षेत्रावर घेतलेल्या सभेत मोदी यांनी, गेल्या दहा वर्षात शेतकरी तसंच सामान्य जनतेसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला.

माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची काल माळशिरस इथं जाहीर सभा झाली. विरोधी पक्षांच्या कारकिर्दीतील सिंचन प्रकल्प आणि उसाला मिळणारा रास्त भाव यावरून विरोधी पक्षांवर टीका केली. 

****

महाविकास आघाडीचे पुणे तसंच बारामती इथले उमेदवार अनुक्रमे रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काल पुण्यात वारजे इथं जाहीर सभा घेण्यात आली. मोदी यांनी केलेल्या आरोपांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या सभेत प्रत्युत्तर दिलं. राज्याच्या राजकारणात झालेल्या पक्षांतरासह इतर घडामोडी तसंच तपास संस्थांकडून होणाऱ्या कारवाईच्या मुद्यावरून या नेत्यांनी भाजपवर टीका केली.

दरम्यान, परवा तीन तारखेला पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार असून, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या देखील पुण्यात रोड शो घेणार आहेत.

****

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काल छत्रपती संभाजीनगरात पदयात्रा तसंच द्वारसभा घेतल्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल कन्नड तालुक्यात चिंचोली, पिशोर तसंच करंजखेडा इथं सभा घेऊन मतदारांना संबोधित केलं.

****

जालना लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी काल बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा इथं सभा घेतली. तर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सोबत फुलंब्री मतदारसंघात झंझावती प्रचार दौरा करून व्यापारी, महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी तसंच नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, परवा तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

****

नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा भाजपाने सोडला असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितरित्या निर्णय घेतील, उमेदवारी घोषित करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाने दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वराज यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने आमदार सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे.

****

शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांना तर दक्षिण मुंबई मतदार संघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षानं काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं.

**

काँग्रेस पक्षानेही आपल्या चार उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यात उत्तर मुंबईतून भूषण पाटील, हरियाणातल्या गुरगाव इथून राज बब्बर तर हिमाचल प्रदेशच्या कंगरा इथून आनंद शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद तसंच लातूर लोकसभा मतदारसंघांत दोन ते पाच मे दरम्यान ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृह मतदान होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील तीन हजार ५४२, तर ८५१ दिव्यांग असे एकूण चार हजार ३९३ मतदागृह मतदान करणार आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील एक हजार ८९३, तर ४६३ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार असून, यासाठी १३० मतदान पथकं स्थापन करण्यात आली आहेत.

****

महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई इथं मुख्य शासकीय सोहळ्यात आज सकाळी आठ वाजता ध्वजारोहण केलं जाणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश आकाशवाणीवरुन सकाळी नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे.

****

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण हक्क अधिनियम-आरटीई अंतर्गत महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ काल सकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर ३३ प्रवासी जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला.

****

महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना इतरांनाही मतदान करायला प्रोत्सहित करावं, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल इथं महिला मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळीहम मतदार हैया गीतावर नृत्य सादर झालं. तसंच उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघातल्या निवडणूक खर्चांची तपासणी तीन, सात आणि ११ मे रोजी होणार आहे. उमेदवार अथवा त्यांचे खर्च प्रतिनिधी यांनी यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च तपासणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या सात तारखेला मतदान होणार असून, या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी काल यासंदर्भातले आदेश जारी केले.

****

बीड निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी काल शासकीय तंत्रविद्या निकेतन इथं निवडणुकीनंतर ठेवण्यात येणाऱ्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्राची पाहणी केली. सात मे पूर्वी सर्व कामं पूर्ण व्हावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

एक जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघाची काल घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या या संघात हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. यष्टीरक्षक ऋषभ पंतचं संघात पुनरागमन झालं असून, के एल राहुलला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. उर्वरित संघात विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

****

बांगलादेशात सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल झालेला दुसरा सामना भारतीय संघानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे जिंकला. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत वीस षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. उत्तरादाखल भारतीय महिला संघानं सहाव्या षटकांत एक बाद ४७ धावा केल्या तेव्हा पाऊस आला. त्यामुळे भारतीय महिला संघाला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार १९ धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेली नांदेड-पनवेल-नांदेड मार्गे औरंगाबाद-कल्याण ही विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुटी दरम्यान या विशेष गाडीच्या चाळीस फेऱ्या मंजूर केल्या होत्या, परंतू प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ही गाडी रद्द करण्यात आली.

रम्यान, नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेड इथून सकाळी साडेनऊ ऐवजी संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान सोलापूर नोंदवलं गेलं. परभणी इथं ४१ पूर्णांक सहा, तर औरंगाबाद इथं ४० पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments: