Wednesday, 22 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:22.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 May 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातले हॉटेल, ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट सूट- ब्लॅक, या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम, तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातल्या सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, मध्यरात्री दीड वाजेनंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, महिला वेटर्समार्फत रात्री साडे नऊ नंतर कोणतीही विदेशी दारू पुरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

दरम्यान, पुण्यातल्या या कार अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीनं विनानोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशी वाहनं आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्याचं पाऊल आरटीओने उचललं आहे.

****

मुंबईतल्या घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष तपास पथक - एसआयटी स्थापन केली आहे. यामध्ये एकूण सहा अधिकारी असतील. एसआईटी चमूने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या घरी शोध मोहीम हाती घेतली आणि होर्डिंग कराराशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.

****

पशुसंवर्धन विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी चारा नियोजन केलं असून, राज्यात चारा टंचाई भासणार नसल्याची ग्वाही, महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं ते काल प्रसार माध्यमांशी बोलत होते. यंदा चारा उत्पादन करण्यासाठी शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे, तसंच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या चाऱ्याचा दर शासनानं निश्चित केला असून, उत्पादीत झालेला संपूर्ण चारा खरेदी करण्याची हमी देखील शासनानं घेतली असल्याचं, विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्यात यंदा खरीप हंगामात ४८ लाख टन खत पुरुवठयाचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी ४५ लाख ५३ हजार टन खत पुरवठयाचं नियोजन मंजूर केलं आहे. तसंच युरिया आणि डीएपी या खतांचा संरक्षित साठा कऱण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, या खंतांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे युरिया खताच्या ४५ किलो गोणीची किंमत २६६ रूपये ५० पसै असल्याची माहिती कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम एप्रिल महिन्यापासून सुरू झालेलं असून, आतापर्यंत सुमारे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी, नागरिकांच्या याबाबतीतल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या नागरिकांना नालेसफाईच्या कामाबाबत तक्रार नोंदवायची असेल, त्यांनी ती नियंत्रण कक्षाच्या, ८५ ५१ ०५ ८० ८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी असं आवाहन कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी केलं आहे.

लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडूनही मान्सूनपूर्व नाले सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत आतापर्यंत सहा मोठ्या आणि ४० छोट्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ही सफाई मोहीम येत्या सात जूनपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचं लातूरचे मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी सांगितलं.

****

लातूर लोकसभा मतदारसंघात चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष प्रतिनिधी आदींनी निवडणूक आयोगाने मतमोजणीविषयी दिलेल्या निर्देशांचं पालन करून सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मतमोजणी प्रक्रिया आणि पूर्वतयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित उमेदवार, प्रतिनिधी यांच्या बैठकीत त्या काल बोलत होत्या.

****

हवामान

नैऋत्य मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या बऱ्याच भागात तसंच अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात नैऋत्य मान्सून येत्या दोन दिवसांमध्ये पुढे सरकेल अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 23 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 23 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...