Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून नव्यानं निवडणूक
कार्यक्रम जाहीर
· डोंबिवली स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना अटक-मृतांची
संख्या ११ वर
· एसटी महामंडळाच्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद
· 'सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात
सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार
आणि
· अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ
अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर
****
विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक
आयोगानं नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ, कोकण
पदवीधर मतदार संघ,
नाशिक शिक्षक मतदार संघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी आता
२६ जून रोजी मतदान होईल. यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास ३१ मे पासून सुरुवात
होईल, सात जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १० जून रोजी अर्जांची छाननी होईल, १२
जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर आवश्यकता भासल्यास, २६
जून रोजी मतदान होऊन १ जुलै रोजी मतमोजणी होईल, असं निवडणूक आयोगानं आज जारी
केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ
राज्यांमधल्या ५८ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या १४, हरियाणा
दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा
सहा, झारखंड चार,
तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.
****
देशात रोजगार निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात
या वर्षीच्या मे महिन्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षाच्या तुलनेत
प्रथमच ही वाढ नोंदवल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. जुलै २०१० पासून खाजगी क्षेत्रातल्या
उत्पादनात झालेल्या वाढीमुळे सेवा क्षेत्र मजबूत झालं असून, त्यामुळे
एकूण आर्थिक विस्ताराला गती मिळाल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
****
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी
मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी शहरातील पेठरोड येथून ताब्यात घेतले
आहे. अटक टाळण्यासाठी त्या एका नातेवाईकाकडे लपून राहत असल्याची माहिती नाशिक पोलिसांना
मिळाली होती. त्यानुसार काल रात्रीपासून नाशिक गुन्हे शाखा एक आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत
त्यांना अटक केली.
दरम्यान, या स्फोटातील मृतांची
संख्या ११ वर पोहोचली आहे. आज दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाकडून शोधकार्य राबवण्यात आलं. या घटनेत ६० हून अधिक जण जखमी असून अनेकांची प्रकृती
चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत १२ वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा
देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह सात जूनपर्यंत
आवेदनपत्र भरावेत,
असं आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे. विलंब
शुल्कासह बारा जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आवेदन करता येणार
आहे.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने
१ जानेवारी २०२४ पासून बस तिकिटासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रणालीमार्फत आतापर्यंत १२ लाख ९२ हजार तिकिटांची
विक्री झाली आहे. या सुविधेसाठी परिवहन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच भ्रमणध्वनीवरील
एम एस आर टी सी बस रिजर्व्हेशन या ॲपचा देखील प्रवाशांनी वापर करावा, असं
आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
****
पुण्याच्या एफ टी आय आय अर्थात भारतीय चित्रपट
आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या 'सनफ्लावर्स
वेअर द फर्स्ट वन्स टू नो'
या लघुपटाला ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा
'ल सिनेफ'
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचं कथानक
कर्नाटकातल्या लोककथेवर आधारित आहे. याचं चित्रीकरण सूरज ठाकूर, संकलन
मनोज व्ही. आणि ध्वनीसंयोजन अभिषेक कदम यांनी केलं आहे. जगभरातल्या ५५५ चित्रपट प्रशिक्षण
संस्थांमधून आलेल्या २ हजार २६३ लघुपटांमधून निवड झालेले १८ चित्रपट या पुरस्काराच्या
स्पर्धेत होते.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव
पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर
करण्यात आला आहे. १४ जून रोजी हे पुरस्कार समारंभपूर्वक दिले जाणार आहेत, परिषदेचे
अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त
घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर'
यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्यं, एकपात्री
प्रयोग, नाट्यछटा,
नाट्यसंगीत पद गायन, तसंच नाट्य अभिवाचन यावेळी सादर
होणार असल्याची माहितीही दामले यांनी दिली.
****
पुण्यामध्ये खडकवासला इथल्या एनडीए अर्थात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला.
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. प्रबोधिनीच्या १४६ व्या
अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभही काल पार पडला. १७ परदेशी कॅडेट्ससह २०५ कॅडेट्सना
यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, धाराशिव
आणि वाशी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले असून उर्वरीत पाच तालुक्यात
दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त
तालुक्यासाठी २०८ कोटी ५० लाख ७६ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी
सचिन ओंबासे यांनी या अनुषंगाने आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीतील विविध उपाययोजनांचा
समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला असून, सदर
कालावधी करीता दोन हजार ८९५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात
आल्या असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, धाराशिव तालुक्यातील
तेर, पानवाडी,
आदी शिवारात गुरुवारी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानाची आमदार
राणा जगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या नुकसानाचे तत्काळ
पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
****
जालना बस स्थानकातून ५ वर्षीय मुलीला पळवून
नेल्याच्या प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसात तपास लावल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार
बंसल यांच्या हस्ते संबंधित पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त
पोलीस अधिक्षक आयुष नोपणी,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथं वाळुची अवैध
वाहतुक करणारा हायवा वाहनासह सुमारे ३० लाखाचा मुद्देमाल प्रशासनाने जप्त केला आहे.
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तालुक्यामध्ये वाळुच्या
अवैध वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी काल
ही कारवाई केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात गुंज
इथले वीर सैनिक अंकुश एकनाथ वाहुळकर यांच्या पार्थिव देहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. २२ मे रोजी पश्चिम बंगालच्या बिनागोडी इथं त्यांचं अपघाती निधन झालं होतं.
****
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने
व्हॉटसअप कॉल करुन तरुणाला धमकावणाऱ्या दोन जणांना धुळे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं
आहे. खोडसाळपणा करण्यासाठी हा कॉल करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाल्याची
माहिती समोर आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी
विज्ञान केंद्रात कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतकरी प्रशिक्षणाला सुरुवात
झाली आहे. २० जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कृषि विज्ञान केंद्राचे
वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके
यांच्या हस्ते करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील २५ प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणाचा
लाभ होणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधू हिने
मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज सकाळी कौलांलपूर
इथं झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या हान हुई हिचा २१-१३, १४-२१, २१-२२
असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment