Friday, 24 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मराठवाड्यातला दुष्काळ निवारण्यासाठी प्रशासन सज्ज-विभागीय आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा दिलासा

·      खरीप हंगामात संभाव्य बोगस खतं आणि बियाणं प्रकरणी थेट अटकेचे प्रशासनाला निर्देश  

·      डोंबिवली स्फोट आणि अहमदनगर नौका दुर्घटनेसह राज्यात विविध अपघातात काल २३ जणांचा मृत्यू

आणि

·      मराठवाडा तसंच विदर्भाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम

 

सविस्तर बातम्या

दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य, चारा उपलब्धतेच्या उपाययोजना आणि आगामी मान्सूनपूर्व उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीनुसार टँकर पुरवठा करावा, पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद करु नये, आदी सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पाणी पातळी वाढवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,

वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातले जे काही उपाय करायचे आहेत. एन जी ओ आहेत. अनेक एन जी ओ आहेत. त्यामध्ये नाम फाऊनडेशन आहे. आर्ट ऑफ लिविंग श्री श्री रविशंकर आहे . त्याच्यामध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे. अनेक एन जी ओ आहेत. त्यांची देखील मदत घेऊन,  या मध्ये गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपेसिटी वाढवण्यात येईल आपल्याकडे एक दीड महिना आहे. पाणी टंचाई, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचं प्रश्न हा एक विषय झाला. पुढचं जे आहे, अवकाळी असेल किंवा पावसाळ्या मध्ये प्री-मान्सून वर्क त्यासाठी घेण्याची काळजी या सर्व विषयावर चर्चा झाली आणि प्रशासन पूर्णपणे अर्लट आहे.

या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्यासह मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

विभागात ६८ तालुके आणि ३५४ महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त तालुके आणि मंडळ म्हणून समावेश करण्यात आला असून,  या सर्व क्षेत्रात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतं आढळली तर संबंधितांना थेट अटक करण्याचेच आदेश देण्यात आले असून, मुख्य वितरकांची तपासणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या काही दिवसात विभागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन भरपाई देण्यासंदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

लातूर इथंही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी काल पाणी टंचाई उपाययोजनांसंबंधी आढावा बैठक घेतली. पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेवून शहरी भागासोबतच गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठ्यासाठी विहिरी तसंच विंधन विहारींचं अधिग्रहण, तात्पुरती पूरक नळ योजना, नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पाणी टंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचं निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार काल संपला. या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५८ मतदारसंघात उद्या २५ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार, तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगानं काल जाहीर केली. महाराष्ट्रातल्या तेरा मतदारसंघांसह देशातल्या एकूण ४९ मतदारसंघात ६२ पूर्णांक दोन टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

****

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल करवीर तालुक्यात सडोली खालसा या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते.

****

राज्यात काल वेगवेगळ्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या औद्योगिक वसाहतीत मधल्या अमुदान या रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांसह आठ कामगारांचा मृत्यू झाला, तर ५६ कामगार जखमी झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या बचावकार्याला प्राधान्य देण्यात आलं असून, त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्याच्या विविध भागात काल पाण्यात बुडून ११ जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीत बचाव कार्य सुरु असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातले तीन जवान, दोन तरुण, आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. परवा बुधवारी प्रवरा नदीत दोन मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरु असताना ही घटना घडली. शोधमोहीम सुरू असताना पाण्याच्या भोवऱ्यात नाव उलटल्यानं हा अपघात झाला. मृत जवानांमध्ये धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, राहुल पावरा आणि वैभव वाघ यांचा समावेश आहे.

दरम्यान, या घटनेत मृत झालेल्या जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या सर्व मृत जवानांच्या पार्थिव देहावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहीली. पोलीस पथकाद्वारे सलामी देवून हे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले.

****

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या देव नदीवरील कुंदेवाडी इथल्या बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सोळा वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात सिन्नर परिसरात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

अन्य एका घटनेत नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातल्या बोरपाडा धरणात, दोन सोळा वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू झाला. उज्वला गावित आणि मिखा गावित अशी दोघींची नावं असून, गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी त्या काल सकाळी अंघोळीला गेल्या असताना ही दुर्घटना घडली.

****

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात जीवाचीवाडी साठवण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. नितीन काळे असं मृत तरुणाचं नाव असून, तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. 

****

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातल्या मुक्रमाबादजवळ दुचाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमरास ही घटना घडली.

****

सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतले सर्व सहा मृतदेह काल राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला सापडले. यामध्ये तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली होती.

****

मुंबईत घाटकोपरच्या जाहिरात फलक दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतल्या एकूण मृतांची संख्या १७ झाली आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात काल सर्वाधिक ४५ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अमरावती सह मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथं काल ४३ अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. परभणी ४१, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

****

हिंगोली शहर परिसरात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतीत मशागतीच्या कामात व्यत्यय आला.

****


वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.

नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं दीक्षाभूमी इथल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या जागजई इथं बुद्धपोर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातल्या बांधवांची जत्रा भरली होती.

छत्रपती संभाजीनगर शहरात भिक्खू संघाच्या वतीने पदफेरी काढण्यात आली. शहरातल्या बुद्धलेणी परिसरात धम्मध्वजारोहण करुन निघालेल्या या पदफेरीमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते.

हिंगोली शहरात बुद्ध पोर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून फेरी काढण्यात आली.

नांदेड शहरात पौर्णिमानगर इथं तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. 

दरम्यान, वैशाख पौर्णिमेनिमित्त काल ठिकठिकाणच्या अभयारण्यात प्राण्यांची गणनाही पार पडली.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि सनारायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...