आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
२०१४ च्या निवडणुकीत भ्रष्टाचार, २०१९ मध्ये लाभार्थी आणि २०२४ च्या निवडणूकीत विकसित भारत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ही निवडणूक महत्त्वाची असून देशाच्या अपेक्षेप्रमाणे विकसित भारताचं लक्ष्य गाठणार की नाही हे
ठरवणारी असल्याचं नमूद केलं.
****
छत्तीसगढच्या बस्तर भागात काल सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले. अबुझमाडच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि इतर सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
****
देशातल्या युवकांना ॲनिमेशन आणि व्हिजुअल इफेक्ट याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स या केंद्राची स्थापना केली जाईल, असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नईत बातमीदारांशी बोलत होते. तीन लाख कोटीहून मोठ्या अशा चित्रपट निर्माण उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञानानं पारंगत अशा युवकांची गरज असून, चित्रपट उद्योगाची ही गरज केंद्र पूर्ण करेल, असं ते म्हणाले.
****
अँटवर्प इथं सुरु असलेल्या एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत काल भारतीय पुरुष संघाला बेल्जियमकडून एक - चारने पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे याच ठिकाणी भारतीय महिला हॉकी संघाचा देखील बेल्जियमकडून दोन - शून्य असा पराभव झाला.
****
मलेशियात क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटंन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात सिंधुनं चीनच्या हान यू हिचा २१-१३, १४-२१, २१-१२ असा पराभव केला. बॅडमिटंन
****
देशात अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमध्ये ४८ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाकडून गुजरात, मध्य दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश साठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment