Saturday, 25 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:25.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार-निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज मतदान

·      विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर

·      कान चित्रपट महोत्सवात सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

आणि

·      आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक-उद्या कोलकाता नाईट रायडर्ससोबत अंतिम सामना

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आज सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर मतदान केंद्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाली आहे, न्‍यायाधीश दीपांकर दत्‍ता आणि सतीश चन्‍द्र शर्मा यांच्या पीठानं या याचिकेवरील सुनावणी काल स्थगित केली. ही सुनावणी लोकसभा निवडणुक संपल्यानंतर घेण्यात येईल असं न्यायालयानं सांगितलं. 

 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५८ मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार, तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.

****

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगानं नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षक मतदार संघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी आता २६ जून रोजी मतदान होईल. यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास ३१ मे पासून सुरुवात होईल, सात जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १० जून रोजी अर्जांची छाननी होईल, १२ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर आवश्यकता भासल्यास, २६ जून रोजी मतदान होऊन १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

****

दूरसंचार विभागाने सहा लाख ८० हजार मोबाईल क्रमांकांची फेरपडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे क्रमांक घेण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट पुराव्यांचा वापर झाल्याच्या संशयावरून हे निर्देश देण्यात आले आहेत. सेवा प्रदाता कंपन्यांनी पुढच्या साठ दिवसांत या क्रमांकाची फेरपडताळणी न केल्यास, या क्रमांकांची सेवा खंडीत केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं आहे. सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकर यांच्याविरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्या होत्या, आणि त्यावर आक्षेप घेत पाटकर यांनी खटला दाखल केला होता. तर पाटकर यांनी आपल्याविरुद्ध अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल सक्सेना यांनी त्यांच्यावर २ खटले दाखल केले होते. सन २००० पासून हा न्यायालयीन वाद सुरु आहे.

****


डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी त्या नाशिक इथं एका नातेवाईकाकडे लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल त्यांना अटक केली.

दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

****

विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढारकर यांचं काल नागपुरात निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. यशवंतराव पेंढारकर यांच्या नेतृत्वात कंपनीने काळसुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले. इकॉनॉमिक टाइम्सचा ब्रॅण्ड ऑफ द ईयर २०२३ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही कंपनीला त्यांच्याच कार्यकाळात प्राप्त झाला. यशवंतराव यांच्या पार्थिव देहावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पार्श्वभूमीवर पीक कर्जाचं पुनर्गठन, पीक कर्ज तसंच वीज देयक वसुलीला स्थगिती, यासह विविध मागण्या पवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १२ वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह सात जूनपर्यंत तर, विलंब शुल्कासह १२ जूनपर्यंत आवेदन करता येणार आहे.

****

पुण्याच्या एफ टी आय आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटानं सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातल्या ५५५ चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या २ हजार २६३ लघुपटांपैकी निवड झालेले १८ चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते, त्यातून या चित्रपटाची या पुरस्कारासाठी निवड झाली.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. १४ जून रोजी हे पुरस्कार समारंभपूर्वक दिले जाणार आहेत, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्यं, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, तसंच नाट्य अभिवाचन यावेळी सादर होणार असल्याची माहितीही दामले यांनी दिली.

****

भारतीय बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधू हिने मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कौलांलपूर इथं काल झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या हान हुई हिचा २१-१३, १४-२१, २१-२२ असा पराभव केला. सिंधूचा आज उपांत्य फेरीत थायलंडच्या बॅडमिंटन पटूशी सामना होणार आहे. दरम्यान, महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या अश्मिता चलिहा हिचा पराभव झाला. या स्पर्धेत इतर गटातही भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

इंडियन प्रीमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल चेन्नईतल्या के एम चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला. उद्या रविवारी याच मैदानावर सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

****

पुण्यामध्ये खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. प्रबोधिनीच्या १४६ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभही काल पार पडला. १७ परदेशी कॅडेट्ससह २०५ कॅडेट्सना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, धाराशिव आणि वाशी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले असून उर्वरीत पाच तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषीत करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या अनुषंगाने काल धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात  आढावा बैठक घेतली.

दरम्यान, धाराशिव तालुक्यातील तेर, पानवाडी, आदी शिवारात गुरुवारी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानाची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

जालना बस स्थानकातून ५ वर्षीय मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसात तपास लावल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह तपास पथकाचा काल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधिक्षक आयुष नोपणी यावेळी उपस्थित होते.

****

बीड इथल्या राज्य परिवहन महामंडळाचा कामगार अधिकारी दिनेश बाबुलाल राठोड याला ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ अटक केली. एका कर्मचाऱ्याला इच्छित ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी त्याने ६० हजार रुपये लाच मागितली होती. त्यातला पहिला हप्ता घेताना त्याला काल जेरबंद करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात गुंज इथले वीर सैनिक अंकुश एकनाथ वाहुळकर  यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. २२ मे रोजी पश्चिम बंगालच्या बिनागोडी इथं त्यांचं अपघाती निधन झालं होतं.

****

बीड जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात पाच तृतीयपंथीयांना ज्यूट तसंच कापडी बॅग तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांना परतफेडीच्या क्षमते नुसार कर्ज दिलं जाणार आहे. शहरात किमान २० तृतीयपंथीयांना शिवणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला जाणार असल्याची माहिती दीनदयाल शोध संस्थेचे संचालक गंगाधर देशमुख यांनी दिली.

****

राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगाव इथं ४५ पूर्णांक चार, ब्रह्मपुरी ४५, वाशिम, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ इथं पारा ४४ अशांच्या वर पोहोचला होता.

मराठवाड्यात परभणीत ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगरात ४३ पूर्णांक चार तर नांदेड इथं ४२ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: