Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 03 June 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०३ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया
सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी-मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे गौरवोद्गार
·
उद्याच्या मतमोजणीसाठी राज्यभरात
नियुक्त साडे चौदा हजारावर कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज
·
देशभरातल्या महामार्गांवरच्या
पथकराच्या दरात ५ टक्के वाढ
आणि
·
दुष्काळ निवारणासाठी तातडीने
पावलं उचलावीत-शरद पवार यांची मागणी
****
लोकसभा
निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त
राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ते आज दिल्लीत
पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत फेरमतदानाच्या सर्वात कमी घटना घडल्याचं सांगत,
एकंदर निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी केलेल्या
प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं. निवडणूक काळात रोकड, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि
मद्यासह १० हजार कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
२३ देशांच्या अभ्यासकांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची पाहणी करून माहिती घेतल्याचं,
आयोगाकडून सांगण्यात आलं. दरम्यान, मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर
results.eci.gov.in वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध असतील अशी माहिती आयोगातर्फे
देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या
४८ लोकसभा मतदार संघात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या
दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं
दिली आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात
आले आहेत.
****
औरंगाबाद
लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात
होणार आहे. टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून त्यासाठी ६८ कर्मचारी नियुक्त आहेत,
तर मतदान यंत्रांतली मतमोजणी ८६ टेबलवर सुमारे साडे सहाशे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने
सरासरी २७ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा
क्षेत्रनिहाय संकेत रंग देण्यात आले आहेत.
जालना
इथं औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती अॅटो कम्पोनन्टस इथं मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी
सुमारे तेराशे कर्मचारी असून, सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४
टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण दहा टेबल असतील. निवडणूक
निरीक्षक शैलबाला मार्टीन आणि मतमोजणी निरीक्षक प्रदीप अहलावत यांनी आज या मतमोजणी
केंद्राला भेट देऊन नियोजनाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.
बीड
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. या लोकसभा मतदार संघात ४१ उमेदवार
असल्याने मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. सुरुवातीला सहा हजार टपाली मतं मोजली जाणार
असून, त्यानंतर सहा विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
या दरम्यान, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसाठीची बैठक व्यवस्था खंडेश्वरी मैदानावर करण्यात
आली आहे.
परभणी
इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत
मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार
आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तसंच राज्य राखीव दलाचे पोलिस आणि स्थानिक
पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि
पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी यांनी पाहणी करून आढावा घेतला.
हिंगोली
इथं लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. ८४
टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एम. एस. अर्चना
आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यांत होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील
तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल. मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय
सहा मतमोजणी कक्षात प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
नांदेड
इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी
१४ टेबल असून, प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्जर्व्हर
उपस्थित राहणार आहेत. जवळपास २ हजार अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कामात नियुक्त करण्यात
आले आहेत. मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उस्मानाबाद
लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धाराशिव इथल्या तुळजापूर रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन
इमारतीमध्ये होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून, या प्रक्रियेसाठी जवळपास
पंधराशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
मुंबई
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या तीन मतदारसंघांसाठी राजिंदरसिंग तारा
यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी
सोनाली मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये विलेपार्ले, चांदिवली,
अणि कुर्ला या तीन मतदार संघांचा समावेश आहे.
****
मतमोजणीच्या
ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन उद्या निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात
येणार आहेत. तसंच निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा ‘निवाडा जनतेचा’ हा कार्यक्रम
सकाळी ९ वाजल्यापासून सादर होणार आहे.
****
काँग्रेस
नेते जयराम रमेश यांना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांच्यावर केलेल्या
आरोपासंदर्भात तथ्यात्मक माहिती सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यास केंद्रीय
निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. शहा यांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून काही
सूचना केल्याचा आरोप रमेश यांनी केला होता. यासंदर्भात आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत
तथ्यात्मक माहिती सादर करण्याची सूचना आयोगाने रमेश यांना केली आहे. रमेश यांच्या या
आरोपासंदर्भात देशभरातल्या एकाही जिल्हाधिकाऱ्याने आयोगाकडे काहीही तक्रार केलेली नसल्याचंही
आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या महामार्गांवरच्या पथकराच्या दरात ५ टक्के वाढ केली
आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. देशातल्या महामार्गांच्या जाळ्यावर एकूण ९००
पथकर नाके आहेत.
****
माजी
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त आज मुंबईत भारतीय
जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश सचिव
नवनाथ पडळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
माजी
मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या स्मृतींना
अभिवादन केलं. विभागात इतरत्रही गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली.
****
दुष्काळ
आणि पाणी तसंच चारा टंचाई या समस्या निवारणासाठी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली
आहे. या मागणीचं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलं आहे.
या समस्यांकडे लक्ष वेधूनही जर राज्य सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेऊन कार्यवाही केली
नाही तर जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेऊ असा इशाराही पवार यांनी पत्राद्वारे
दिला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी उद्या चार जूनपासून मराठा आरक्षणाच्या
सगेसोयरे कायद्याची अंमलजबाजवणी आणि इतर मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या उपोषणास परवानगी
देऊ नये, असं निवेदन आंतरवाली ग्रामस्थांनी आज
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. या उपोषणामुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. त्यामुळे
जिल्हाधिकाऱ्यांनी या उपोषणास परवानगी देऊ नये, असं निवेदनात नमूद आहे.
****
राज्यातील
निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासंदर्भात दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या
संदेशांबाबत सावध राहण्याचं आवाहन लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्यावतीनं करण्यात आलं
आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा
दूरध्वनी अधिदान आणि लेखा कार्यालय तसंच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात
नाही. तसंच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवलंही जात नाही,
असं या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment