आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
देशातल्या यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या संख्येनं गेल्या महिन्यात नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात यूपीआयद्वारे दोन लाख कोटीपेक्षा अधिक रकमेचे १४० लाखांहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळानं दिली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यूपीआय व्यवहारांच्या संख्येत ४९ टक्क्यांनी, तर किमतीत ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
****
अग्निपथ योजनेची अंमलबजावणी ही सेना आणि राष्ट्र उभारणीत, युवा शक्ति राखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणांपैकी एक असल्याचं, सरसेनाअध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आयएनएस चिल्का मधल्या अग्निवीरांना संबोधित करताना ते काल बोलत होते.
****
तेलंगणामध्ये विधानपरिषदेच्या मेहबुबनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारत राष्ट्र समितीने विजय मिळवला आहे. बीआरएसच्या नवीन कुमार रेड्डी यांनी काँग्रेसच्या मान्न जीवन रेड्डी यांचा अवघ्या १०८ मतांनी पराभव केला.
****
गुजरात सहकारी दूध विपणन महामंडळानं अमूल दुधाचा दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढवला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली.
****
आसाममध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, १३ जिल्ह्यातल्या ५६४ गावांमधल्या पाच लाखाहून अधिक नागरीकांना पुराचा फटका बसला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, आठ हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती क्षेत्राचं नुकसान झालं आहे. राज्यात आतापर्यंत पावसाशी निगडीत विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंज जवळ नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातली असण्याची शक्यता असून, मृतकांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
नांदेड शहर आणि परिसरात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी पाच जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment