Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· लोकसभेच्या ५४२ मतदार संघांमध्ये आज मतमोजणी-प्रशासकीय तसंच सुरक्षा यंत्रणा सज्ज
· राज्यभरात ४८ लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी साडे चौदा हजारावर कर्मचारी नियुक्त
· दुष्काळ निवारणासाठी तातडीने पावलं उचलावीत-शरद पवार यांची मागणी
· आंतरवाली सराटी ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध-मनोज जरांगे पाटील यांचं आजचं आंदोलन स्थगित-जालना जिल्ह्यात संचारबंदी
आणि
· क्रिकेटपटू केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
****
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातल्या ५४३ पैकी ५४२ मतदार संघांमध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल. गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. दरम्यान, आजच्या मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध असतील अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघातल्या मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल मतमोजणी केंद्रांवरच्या तयारीचा आढावा घेतला. मतमोजणीची रंगीत तालीम तसंच इतर आवश्यक प्रक्रियाही काल पार पडल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. या सर्व मतमोजणी केंद्रांच्या तयारीचा हा संक्षिप्त आढावा....
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून त्यासाठी ६८ कर्मचारी नियुक्त आहेत, तर मतदान यंत्रांतली मतमोजणी ८६ टेबलवर सुमारे साडे सहाशे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सरासरी २७ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा कक्षांना संकेत रंग देण्यात आले आहेत.
**
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती अॅटो कम्पोनन्टस इथं मतमोजणी होणार आहे. यासाठी सुमारे तेराशे कर्मचारी नियुक्त असून, सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय दहा टेबलवर टपाली मतांची मोजणी होणार आहे.
**
बीड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. या लोकसभा मतदार संघात ४१ उमेदवार असल्याने मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. सुरुवातीला सहा हजार टपाली मतं मोजली जाणार असून, त्यानंतर मतदान यंत्रावरची मतमोजणी होणार आहे. या दरम्यान, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसाठीची बैठक व्यवस्था खंडेश्वरी मैदानावर करण्यात आली आहे.
**
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तसंच राज्य राखीव दलाचे पोलिस आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
**
हिंगोली इथं लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. ८४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
**
लातूर लोकसभा संघासाठीच्या मतमोजणीसाठी २९ फेऱ्या होणार आहेत, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल. मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय सहा मतमोजणी कक्षात प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
**
नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असून, प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्जर्व्हर उपस्थित राहणार आहेत. जवळपास २ हजार अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कामात नियुक्त करण्यात आले आहेत.
**
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धाराशिव इथल्या तुळजापूर रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून, या प्रक्रियेसाठी जवळपास पंधराशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वार्तांकनासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह देविदास पाठक, धाराशिव
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून सादर होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालांवर भाष्य करणार आहेत.
****
दुष्काळ आणि पाणी तसंच चारा टंचाई या समस्या निवारणासाठी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. या मागणीचं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलं. या समस्यांकडे लक्ष वेधूनही जर राज्य सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेऊन कार्यवाही केली नाही तर जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेऊ असा इशाराही पवार यांनी पत्राद्वारे दिला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास परवानगी देऊ नये, असं निवेदन इथल्या ग्रामस्थांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. या उपोषणामुळे गावातला सामाजिक सलोखा बिघडत असल्याचं, या निवेदनात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आजपासूनचं प्रस्तावित आंदोलन येत्या आठ तारखेपर्यंत पुढे ढकललं आहे. आंदोलनाचं ठिकाण मात्र समाजाशी चर्चा केल्यानंतर ठरवण्यात येईल, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात कलम १४४-दोन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांना यातून सूट देण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवलं आहे.
****
कोल्हापूर शहरात काल चालकाचं नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने सात जणांना चिरडलं. या अपघातात तीन जण जागीच ठार, तर चार जखमी झाले. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांना कार चालवत असतांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं, हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मृतांमध्ये चव्हाण यांचाही समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातही भरधाव कारच्या धडकेत काल एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
****
क्रिकेटपटू केदार जाधवनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये तो न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. केदारने त्याच्या कारकिर्दीत ७३ एकदिवसीय आणि नऊ टी - ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
****
टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूयॉर्क इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला. तर बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात नामिबियानं ओमानचा सुपर ओव्हरमध्ये ११ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तान आणि युगांडा संघादरम्यान सध्या सामना सुरु आहे. दरम्यान, या स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, तर नेदरलँड्स विरुद्ध नेपाळ हे सामने होणार आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात १९ कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागानं कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आलेली दोन केंद्रं कायमस्वरूपी रद्द करण्यात आली, १२ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर ५ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
****
जागतिक सायकल दिनानिमित्त काल जालना जिल्ह्यात भारतीय वैद्यकिय संघटनेच्या वतीनं, सायकल फेरी काढण्यात आली. निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याबाबत नागरिकांमध्ये यावेळी जनजागृती करण्यात आली. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील या फेरीत सहभागी झाले होते.
****
आजच्या लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरची वाहतुक अन्यत्र वळवण्यात आली आहे. परभणी इथंही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसरात मतमोजणी संबंधित ओळखपत्रधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून, नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा इतर कारणास्तव विद्यापीठात येण्याचा आग्रह करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेडहून दुपारी दोन वाजता सुटेल, तर नांदेड - अंब अमडौरा एक्सप्रेस नांदेड इथून दुपारी चार वाजता सुटणार आहे.
****
मराठवाड्याच्या काही भागात काल पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. बीड, जालना तसंच छत्रपती संभाजीनगराच्या अनेक भागात पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment