Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 15 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडमधील जमशेदपूर इथं
टाटानगर-पाटणा वंदे भारत ट्रेनसह सहा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करणार आहेत. तसंच, देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ
आणि ६६० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि
लोकार्पण पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे. पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे या
महाराष्ट्रातील तीन वंदे भारत गाड्यांचं लोकार्पण पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
****
दूरदर्शन आज ६५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ सप्टेंबर
१९५९ ला दूरदर्शनचे पहिले प्रसारण तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
यांच्या हस्ते झाले. सध्या दूरदर्शन सहा राष्ट्रीय आणि २२ प्रादेशिक वाहिन्यांसह
एका अंतरराष्ट्रीय वाहिनीचे प्रसारण करत आहे. रामायण, महाभारत, हमलोग, बुनियाद, मालगुडी डेज आणि उडान या दूरदर्शनवरील मालिका आजही लोकप्रिय
आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ओणमनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. केरळमधला हा सुगीचा सण समृद्ध
परंपरेचं आणि सांस्कृतिक वारशाचा निदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या
संदेशात अन्नदाता शेतकऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ओणम सणानिमित्त शांतता, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केरळच्या
वैभवशाली संस्कृतीचा हा
सण जगभरातील मल्याळी समुदाय उत्साहाने साजरा करतो असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभियंता दिनानिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. प्रगती, नाविन्य आणि विविध क्षेत्रात अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण
योगदान असल्याचं ते
म्हणाले. सर एम.विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आणि
अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत असल्याची
भावना व्यक्त केली. अभियंता दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसिद्घ केली.
****
मोदकाचा गणपती म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली
इथंल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानकडून यंदा एक लाख ५१ हजार नवसाचे मोदक वाटप करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे
सचिव दिलीप बांगर यांनी सांगितलं.अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवसाचा मोदक भक्तांना
वाटला जातो. संपूर्ण
वर्षभर या मोदकाची पूजा केली जाते. त्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर एक
हजार एक मोदक गणपतीला अर्पण केले जातात.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे
येत्या २७ सप्टेंबरला
जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. 'पर्यटन आणि शातंता' हे या वर्षीचे जागतिक
पर्यटन दिनाचे घोषवाक्य आहे. यानिमित्त
परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील कैलाश लेणी इंथ लोकसंवाद फाऊंडेशन आणि इंटॅकच्यावतीनं आज सकाळी आठ वाजता हेरिटेज वॉकचं आयोजन केलं होतं. यावेळी योगेश जोशी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित इतिहासप्रेमींना कैलाश लेणीचं महत्व, त्यात कोरलेल्या कलाकृती आणि निर्मितीविषयी माहिती दिली.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इंथ आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी ते वैजापुर इंथ आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. ठाकरे यांच्या उपस्थितीत इतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश होणार आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ
ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय संघाने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात विजय
मिळवला आहे. खुल्या गटात
भारतीय संघाने सर्बियाचा पराभव केला, तर महिला संघाने फ्रान्सवर विजय मिळवला.आज पाचव्या फेरीत
महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी होणार आहे तर खुल्या गटातील पाचव्या फेरीत आज भारतीय संघ अझरबैजानशी
खेळणार आहे.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रानं डायमंड लीगचं रौप्य पदक जिंकलं
आहे. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला
फेकला. डायमंड लीगमध्ये नीरज सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला आहे. नीरजचं
सुवर्णपदक एक सेंटीमीटरनं हुकल असून, स्पर्धेचे सुवर्णपदक अँडरसन पीटर्सनं जिंकले तर जर्मनीच्या
ज्युलियन वेबरनं तिसरं स्थान पटकावलं.
****
शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची
मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment