Sunday, 15 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १५ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दिल्लीतील कथीत दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजुर करताना घातलेल्या अटीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचे नियमीत कामकाज पाहता येत नाही.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची विमानतळावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटा नगर - पाटणासह सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंड दौरा मुसळधार पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं रांची इथूनच आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याचवेळी देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ६६० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्‍थितीत करण्यात आलं.

****

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रातील सरकार आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यातील  शिंदखेडा इथं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. नागरीकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही, नमो ॲप वर किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

 

केंद्र शासनाच्‍या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीनं छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्‍ते आज सकाळी करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा हा त्‍याग आणि संघर्षाचं प्रतिक आहे. हा संघर्ष नव्या पिढीला समजण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असंही त्यांनी सांगितलं. १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.

****

पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार पॅनल उभारण्यास आणि त्यातुन विजनिर्मीती करण्यास सरकार अनुदान पुरवत आहे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल असं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद - -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय येजना करण्यात येत अहे. यावेळी सोडत पद्धतीने क्रमांक काढून त्यानुसार मंडळांना विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...