Monday, 2 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.09.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 02 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते १५ गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, मजूर अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावात तहसीलदार जीवक कांबळे यांनी पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक लवकरच या लोकांची सुटका करतील, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या विविध प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परभणी जिल्ह्यात दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे विष्णुपरी धरणाचे ११ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून, एक लाख ४६ हजार ४४७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

परभणी जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलू गावात वैद्यकीय पथकांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज कोल्हापूर मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

ऑगस्ट महिन्यात एक लाख ७५ हजार कोटी रूपये, वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे. हे संकलन गेल्यावर्षीच्या तुलनेत, १० टक्क्यानं अधिक आहे. गेल्यावर्षी या काळा दरम्यान, १ लाख ५९ हजार कोटी रूपये जीएसटी संकलनं झालं होतं. ऑगस्ट महिन्यात ३९ हजार केंद्रीय जीएसटी संकलन झालं तर, एसजीएसटी म्हणजेच, राज्य जीएसटी संकलन, ३८ हजार ४०० कोटी इतकं झालं.

****

नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

****

समतोल आणि पोषक आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. केंद्र शासनानं देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पोषणविषयक नवोन्मेष आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या केंद्राचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल गडचिरोली इथं झालं. या केंद्राच्या माध्यमातून गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांचं आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात गडचिरोली जिल्हा राज्यात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकानं मुळशी तालुक्यात केलेल्या कारवाईत परदेशी मद्यासह एकूण ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.

****

बैल पोळा आज साजरा होत आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथदेणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.

****

भारतीय खेल प्राधिकरण - साई आणि खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशन यांच्यावतीनेअस्मिता खेलो इंडियाया उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या वुमन्स लीग ज्युदो स्पर्धेचं उद्घाटन काल नाशिक इथं केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. अशा स्पर्धांमुळे युवतींना प्रोत्साहन मिळून त्यांचं सबलीकरण होण्यासही मदत मिळत असल्याचं, खडसे यावेळी म्हणाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह सात राज्यातले ८९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...