Saturday, 7 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला राज्यभरात प्रारंभ-गणेश स्थापनेसाठी सर्वत्र भाविकांची लगबग

·      वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ पदमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारातल्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक

****

गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला आजपासून प्रारंभ झाला. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावीयासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथे गणरायाची प्रतिष्ठापना झाली.

गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.

****

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गणेश चतुर्थीला मुंबईच्या लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.

****

पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.

कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार ८६७ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत असून १२२ सार्वजनिक गणपती विराजमान होत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. सकाळच्या सुमारास घरोघरी गणपती स्थापना झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण, तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.

दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, गणेश भक्तांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच श्री गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. शहरातल्या वीर सावरकर चौक, फुले मार्केट, गांधी चमन चौक, नूतन वसाहत या भागात भाविकांची गणेश मूर्तीसह पूजेचं साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, यावर्षी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीनं चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

****

गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसच यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू इथं एका प्रचार सभेत ते बोलत होते. कलम ३७० हटवल्यानंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक असल्याचं शहा यांनी नमूद केलं.

****

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून तत्काळ पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे ५०० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा सुमारे पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

****

धुळे शहराजवळच्या मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी तिघांकडून विदेशी बनावटीचं पिस्तुल आणि ४ जिवंत काडतूसं हस्तगत केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

****

नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंघ सुरेंद्रसिंघ कालो असं या युवकाचं नाव आहे. अफिम आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

****

गोंदिया जिल्ह्यातल्या पोगझरा गावात नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन आणि दीड वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या वणी-पिंपळगाव रस्त्यावर आज चारचाकी आणि दुचाकी यांच्याझालेल्या अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमधे दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्या समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. उद्याच्या समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी १२ अंतिम फेरीत, दिलिप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी ४७ अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारात खरेदी- विक्री करणाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. जालना इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...