Monday, 9 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.09.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची, तसंच भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशी शिफारस करण्यात आली होती.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौ-यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.

****

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न रोखत सैन्यानं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं. काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांपैकी दोघांना मारल्यानंतर या परिसरात शोध मोहीम सुरू असून, सैन्यानं या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.

****

शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूरसारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर मंत्री पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या हदगाव तालुक्याला भेट दिली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारनं सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नांदेडच्या दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे परभणी भागातल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

****

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱया नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणार्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

भारतीय गिधाड, या धोक्यात असलेल्या आणि विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी प्रजातीसाठी नागपूरच्या पेंच अभयारण्यात जटायू ग्राम मित्र, हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये, गावातले पशुपालक आणि इतर लोक जंगलातल्या एका विशिष्ट ठिकाणी नैसर्गिकरीत्या मरण पावलेल्या पशुपक्षांचे मृतदेह टाकतील, ज्यामुळे गिधाडांना अन्न मिळणं निश्चित होईल. पशुपक्षांचे मृतदेह ठरलेल्या ठिकाणी नेऊन टाकण्या-या लोकांना वाहतुकीचा खर्च दिला जाणार आहे. हा प्रकल्प सध्या एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायकवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरासह, मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...