Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
· सायबर सुरक्षा हा देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.
· राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा.
· किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
आणि
· पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू.
****
सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त दिलीप पावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांनी राज्यपालांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांनी शहरातल्या सुभेदारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात राज्यभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांशी पाणी प्रश्नावर आपण चर्चा केली, तसंच वैधानिक विकास महामंडळा विषयी देखील चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांनी जळगाव इथं लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जळगाव जिल्हा सुवर्णालंकार व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावं, राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचं रखडलेलं काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावं. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा असं राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.
****
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेची पोलिस कोठडी १३ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुख्य संशयित जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली, न्यायालयानं ती काही अंशी मान्य करत, १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू. राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. मात्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे तसंच संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आठ हजार ६०३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नाही तसंच आता लोकसंख्या वाढली असल्याने नाशिक जिल्ह्यालाच पुरेसं पाणी उपलब्ध नाही, असं सांगत, आमदार फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, समन्यायी पाणी वाटपाच्या पुनर्विलोकनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी अभ्यास करून पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश न्यायालयाने दिल्याचं, आमदार फरांदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. महात्मा फुले पुतळा इथून संवादयात्रा रॅली काढण्यात आली. यावेळी भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना अर्थसंकल्पीय तरतूद, जातिनिहाय जनगणना, प्रशिक्षण संस्था अशा एकूण १७ मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
****
प्राथमिक शिक्षक पदाकरिता केवळ पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा महाटीईटी’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिक्षण सेवकशिक्षक या पदांकरिता १० नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-१ घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-२ दुपारी २ ते साडे चार वाजे दरम्यान होणार आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३३ पूर्णांक ३९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यतल्या उर्वरीत १३१ पात्र शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी थेट हस्तांतरण योजना अर्थात डीबीटी द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रं लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment