Wednesday, 11 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सायबर गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

·      राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा

·      ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं घरोघरी आगमन-आज गौरीपूजन

आणि

·      पॅरिस परालिम्पिक स्पर्धेत पदकविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसं जाहीर

****

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात काल नवी दिल्ली इथं ते बोलत होते. सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात लवकर राजभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांचं निवेदन राज्यपालांकडे सादर करण्यात आलं.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाला कालपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहणार आहे, आणि हा  लाभ मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करणार असल्याचं, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

****

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा यात समावेश आहे, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रापर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही समिती नेमल्याचं, दानवे यांनी सांगितलं.

****

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइनं १२ जागांची मागणी केली आहे.

****

आगामी ईद--मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घातली आहे, त्यामुळे न्यायालयाने या जनहित याचिकेचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी  केली, मात्र, यावर बंदी हरित लवादानं घातली असेल, तर ही मागणीही हरित लवादासमोरच करावी, असं सांगत, ही सुनावणी पुढे ढकलण्याची सूचना न्यायालयानं केली.

****

ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी आगमन झालं. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार गौरींचं मनोभावे स्वागत करून स्थापना करण्यात आली. आज गौरी पूजन आणि उद्या गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

****

परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण अमेरिकेत मिनिसोटा इथं राहणाऱ्या श्रद्धा बरिदे यांच्याकडून तिथल्या गणेशोत्सवाबाबत जाणून घेऊ या...

‘‘मिन्यापोलिसची एक उल्लेखनीय गोष्ट मला तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल, ती म्हणजे, मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा हे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरं करते. जिथे गणपतीची स्थापना ही इथल्या हिंदू मंदिरात होते. ज्यामुळे केवळ मराठीच नव्हे तर भारतातील इतर राज्यातील लोक ॲज वेल ॲज अमेरिकेतील वेगवेगळ्या कम्युनिटीमधील लोकं त्याच्यामध्ये भाग घेतात. आमच्या मित्रमैत्रीणींकडे सुद्धा गणपती असतो आणि तो आम्ही एकत्रितपणे साजरा करतो. जिथे आरतीसाठी आणि प्रसादासाठी जवळजवळ शंभर सव्वासे लोकं आम्ही एकत्र असतो आणि चढाओढीने आरती म्हणतो.’’

****

पॅरिस परालिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारने रोख बक्षीस जाहीर केलं आहे. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ५० लाख तर कांस्यपदक विजेत्यांना ३० लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. मिश्र स्पर्धेत पदक विजेत्यांना प्रत्येकी साडे बावीस लाख रुपये बक्षीस दिलं जाईल.

दरम्यान सात सुवर्णांसह २९ पदकं मिळवणारा हा संघ काल भारतात परतला. दिल्ली विमानतळावर संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे काल दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात आज पहाटे सुमारे १५ हजार ८६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत होती.

दरम्यान, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावं, असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. काल जिल्हा प्रशासनाच्या या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.

****

मुंबईचं यशवंतराव चव्हाण केंद्र आणि जळगावच्या भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिले पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्य, शेती आणि पाणी या तीन क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहेत. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर इथले कवी गणेश घुले यांचा समावेश आहे. येत्या १९ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून पुन्हा उपोषणाचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते काल जालन्यात वडीगोद्री इथे बोलत होते. आपल्याला राजकारणात जायचं नसून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आपला लढा असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली.

****

किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू, राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती.

****

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ देण्यात यावी, तसंच सोयाबीनला हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. या मागण्या तत्काळ मान्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला.

****

भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा काल नांदेड शहरात दाखल झाली. २८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...