Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची
व्याप्ती वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंळाचा निर्णय, पीएम ई ड्राईव्ह योजना जाहीर
·
आरक्षण व्यवस्थेला कोणीही
बाधा पोहोचवू शकणार नाही-केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
·
सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात
वाढ तसंच निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची
माहिती
·
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन
योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून अयोध्येसाठी नांदेडहून पहिली रेल्वे
आणि
·
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद
हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल
****
आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता ७० वर्षावरील
ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल
झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. देशभरातल्या साडे चार कोटी कुटुंबातल्या सहा कोटी ज्येष्ठ
नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
पीएम ई ड्राईव्ह योजना काल जाहीर करण्यात आली. या योजनेचा दुचाकी, तिनचाकी, ट्रक, रुग्णवाहिका तसंच ई बसला लाभ मिळेल. दोन वर्षांसाठीच्या या योजनेसाठी दहा हजार ९०० कोटी रुपयांना
मान्यता देण्यात आली. देशभरात चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर यात भर देण्यात येत असून, सुमारे ८८ हजार चार्जिंग स्टेशन्स
उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. देशभरात जलविद्युत प्रकल्पांसाठी
१२ हजार ४६१ कोटी रुपये, पीएम ग्रामसडक योजनेसाठी ७० हजार १२५ कोटी रुपये, पीएम ई बस योजनेअंतर्गत ३८ हजार, ई बस साठी तीन हजार ४३५ कोटी, मिशन मौसमसाठी दोन हजार कोटी
रुपये निधीला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
देशातल्या आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीदरम्यान, आरक्षण संपवण्याबाबत विधान
केलं होतं, त्या अनुषंगाने शाह यांनी, सामाजिक माध्यमावरच्या एका
संदेशातून, आरक्षणविरोधी भूमिकेवरून राहुल
गांधी तसंच काँग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या विधानामार्फत काँग्रेस पक्षाचे आरक्षणविरोधी
विचार व्यक्त होत असल्याचं शाह यांनी नमूद केलं.
भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या विविध नेत्यांनी गांधी यांच्या या वक्तव्याचा
निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलतांना, काँग्रेस पक्ष हा मतांसाठी खोटं नरेटिव तयार करतो, हेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं
स्पष्ट झाल्याची टीका केली.
****
दरम्यान, राहुल गांधी यांच्या
आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजप खोटा प्रचार करत असल्याची
टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण
विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा
जास्त मिळावे, ही भूमिका असल्याचं राहुल
गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न
केला, तरी ते त्यांचा
आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ तसंच निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्र
सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही माहिती
दिली. ऊसाचा रास्त आणि किफायतशीर
दर वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याची
ग्वाही पवार यांनी दिली.
****
जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची
कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना
देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या
दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेड इथून २० ते २२ सप्टेंबर दरम्यान निघण्याची
शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची
माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन विशेष
समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी केलं आहे:
“अयोध्या येथे जाण्यासाठी
जवळपास दोनशे लाभार्थ्यांची आम्हाला निवड करायची आहे. आमच्याकडे जवळपास तिर्थदर्शन
योजनेमध्ये शंभरएक प्रस्ताव पात्र ठरले आहेत. असा दोनशे लाभार्थ्यांची पहिली ट्रेन
आपल्या नांदेडमधून निघणार आहे. ती महाराष्ट्रातील पहिली ट्रेन असणार आहे. तर सर्व जेष्ठांना
मी आवाहन करु इच्छितो की, आपण या योजनेचा लाभ घ्यावा. ३० सप्टेंबर पर्यंत आपल्याला
नाव नोंदणी करता येणार आहे.’’
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री
वयोश्री योजनेचे ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी
तीन हजार रुपये अनुदान दिलं जातं.
****
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल घरोघरी साजरा झाला. महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची पारंपरिक
रितीरिवाजानुसार साग्रसंगीत पूजा करून,त्यांना पुरणपोळी, सोळा भाज्या आणि पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरम्यान, पाच दिवसांच्या गणपतींचं काल
अनेक भागात विसर्जन करण्यात आलं.
परदेशात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत आपण जाणून घेत आहोत, बेल्जियममधल्या गणेशोत्सवाबद्दल
माहिती ब्रुसेल्स इथं राहणाऱ्या मुग्धा धुरंधर यांनी दिली, त्या म्हणाल्या…
‘‘बेल्जियममध्ये सार्वजनिक प्रकारे मांडव घालून गणेशोत्सव
साजरा होत नाही. मात्र मंदिरामध्ये गणेश चतुर्थीला गणेश पूजन केले जाते.
वेगवेगळ्या भारतीय संस्थांतर्फे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, डेकोरेशन स्पर्धा अशा कलागुणांना वाव मिळेल अशा स्पर्धा
आयोजित केल्या जातात. घरगूती गणेशोत्सव देखील साजरा केला जातो. बरेच जण घरातील
गणेश मुर्तीची पूजा करतात. गणेश मुर्ती, पुजेचे साहित्य अशा गोष्टी भारतीय दुकानामध्ये उपलब्ध आहेत.
मुळच्या पुण्याच्या पण ब्रुसेल्समध्ये स्थायिक असलेल्या इशा कल्याणी त्यांच्या घरी
गेल्या सहा वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश मुर्तीचे विसर्जन
पाण्याच्या नैसर्गिक स्रोतात करता येत नाही. त्यामुळे शाडुच्या मातीच्या मुर्तीचे
घरीच विसर्जन केले जाते.’’
****
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या
स्पर्धेत काल भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह
यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार
आहे.
****
गुजरात मधल्या एका कंपनीतून ३० टन हायड्रोजन पॅरॉक्साइड घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या
कंटेनरला काल गळती लागल्यानं हा ट्रक हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा
शिवारात माळरानावर मोकळ्या जागेत उभा करण्यात आला आहे. संबंधीत कंपनीकडून मुंबईच्या कळंबोलीहून गळती रोखण्यासाठी
एक पथक रवाना झालं आहे.
दरम्यान, या गळतीमुळे जरोडा
परिसरातल्या महात्मा फुले माध्यमिक शाळेला आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या १० तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या ३ लाख ९१ हजार ४१० महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. कोणतीही पात्र महिला योजनेच्या
लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या माध्यमातून काम
करीत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास
मुदतवाढ देण्यात आली असून, अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज करता येणार आहेत.
****
शेतमालाला योग्य भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या
वतीनं बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काल
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी शेतकरी कुटुंबातल्या महिला वर्गानं या आंदोलनात सहभाग
घेतला.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सध्या अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातली आवक काल सायंकाळी सात हजार घनफुट प्रतिसेकंद पर्यंत कमी झाली होती. दरम्यान, या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठा लगतच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गेवराई आणि माजलगांव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात काल सकाळी भूगर्भातून आवाज झाला. मात्र
भूकंप मापन केंद्रात कसलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये
तसच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment