Thursday, 12 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.09.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 September 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १२ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

नागरी उड्डयनाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात पंतप्रधान संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०३५ पर्यंत प्रतिवर्ष अब्ज प्रवाशांना विमान प्रवासात सामावून घेण्यासाठी आशिया प्रशांत उड्डयन क्षेत्राच्या प्रारुप आराखड्यात धोरणात्मक गुंतवणुकीचं आवाहन केलं आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रात महिलांचा समावेश २५ टक्क्यांनी वाढवणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे.

****

तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ होत आहे. भारतासह अनेक देशांचा सहभाग असलेल्या या सर्वात मोठ्या युद्धाभ्यासाचं भारतीय वायुसेनेनं आयोजन केलं आहे. यासोबतच भारत रक्षा विमानन प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आजपासून परवा १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग असेल. सार्वजनिक क्षेत्रांचे संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खाजगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे.

****

धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. इयत्ता बारावी नंतर तंत्रशिक्षण तसंच व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविदयालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल, ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होईल, यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. इयत्ता बारावी मध्ये किमान ६० टक्के गुण असणारे धनगर समाजाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील आणि त्यांना जास्तीत जास्त वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

****

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळानं आजपासून अडीच हजार बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल, हे गृहीत धरून आजपासून येत्या २० तारखे दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन आरक्षण सुरू असून, गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं, रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितलं आहे.

****

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र तसंच पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने बीड, नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा ' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राबवल्या जाणाऱ्या विविध दैनंदिन उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

आचार्य विनोबा भावे जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं 'दिशा स्वराज्याची' या माहितीपटाचं विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. एमजीएम परिसरातल्या चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृहात येत्या शनिवारी १४ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता हा माहितीपट दाखवला जाईल, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...