Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 13 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १३ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे अन्न
सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश.
· मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण.
· राज्यातल्या ४३४ आयटीआयमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं परवा
उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन.
आणि
· संविधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल
गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर
लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या
मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ
होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि
अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत. ज्या
बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे
फूड सेफ्टी ऑन व्हील्स- अर्थात फिरती पथकं तैनात करावीत, ज्यामुळे
अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळू शकतील, असं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा
विभागातर्फे हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त राजभाषा हीरक
महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या
हस्ते या संमारंभाचं उद्घाटन होईल. यानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा
परिषदेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. भारती पत्रिकेच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे
प्रकाशन आणि राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरणही यावेळी शाह
यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांचं देशाला संबोधन प्रसारित होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आमच्या
केंद्रावरून प्रसारित होणारं, प्रादेशिक बातमीपत्रं सकाळी
सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण
घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात
सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही
सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी
कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं
न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा
दाखल असलेला संशयित जयदीप आपटे याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी
सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आज मालवण
न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याची
न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातला दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला
यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी
महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण
झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात
येईल,
असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती
देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी
झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून
त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती
त्यांनी यावेळी दिली.
****
डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात
घरांची निर्मिती केली जाणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून
मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज
सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि
प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार
आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी यावेळी उपस्थित राहण्याचं
आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान
मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य
संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२
ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण
उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर
इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र
प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या
छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित करण्यात
आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं
आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांनी संविधानाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता
पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार
पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं तर आमदार
प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी
पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात राहुल
गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार,
पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आज
आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा
तिसरा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु
प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
२०२५ या वर्षासाठीच्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. छत्रपती
संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर.एन चिमंद्रे यांनी ही माहिती
दिली. ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांनी awards.gov.in
या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन
करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत
मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या
अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट
आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा संसर्गजन्य आजारावरील परिषदेचं
आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी
भागातील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होणार आहेत.
****
थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या
महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी
महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर
परिमंडलातील ३१८ वीजग्राहकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी २२४
ग्राहकांनी ८७ लाख ८५ हजार
रुपयांची मुद्दल एकरकमी भरून व्याज आणि विलंब माफीचा फायदा घेतला आहे. तर २०
ग्राहकांनी हफ्त्याने रक्कम भरण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
तालुक्यात वडगाव कोल्हाटी आणि तीसगाव इथं वीजचोरी प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू
असलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी
केली.
****
No comments:
Post a Comment