Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· कांदा निर्यातीसाठी किमान मूल्याची अट रद्द-गहू साठवणुकीच्या मर्यादेतही कपात
· मागेल
त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण
· मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर
आणि
· आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी
पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
****
कांदा निर्यातीसाठीची किमान मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली आहे. कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडे पाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती, ही मर्यादा हटवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारातल्या संधीचा लाभ घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गव्हाची साठेबाजी तसंच दरवाढ रोखण्यासाठी वितरण व्यवस्थेतले घाऊक तसंच मोठ्या विक्रेत्यांसाठी साठवणुकीची मर्यादा तीन हजार मेट्रिक टनांवरून दोन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. पुढच्या ३१ मार्चपर्यंत ही मर्यादा लागू असेल.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप
योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. सौर कृषिपंपाच्या
यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी
योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या
पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरं परवडणाऱ्या दरात उभारली जाणार असून, म्हाडाच्या माध्यमातून ती मंजूर केली जाणार आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील दोन हजार ३० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी येत्या १९ सप्टेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याच दिवशी रात्री बारा वाजेच्या आत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा अर्जदारांना करता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर येत आहेत. परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडे ११ वाजता मुख्यमंत्र्यांचं लातूर विमानतळावर आगमन होईल, तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे प्रस्थान
करतील. सायंकाळी सव्वा चार वाजता लातूर मार्गे ते विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. परांडा इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण
योजनेतील लाभार्थी महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाच्या
मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं उपोषणास बसलेल्या राजश्री उंबरे यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वेरूळ इथल्या शहाजी राजे स्मारकाबाबत
बैठक घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना निर्देश दिले.
****
हिंदी राजभाषा दिवस आज साजरा होत आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी
समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन होईल. हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांचं देशाला उद्देशून संबोधन आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे.
****
अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर आता श्री विजयपुरम म्हणून ओळखलं जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. ऐतिहासिक चोल साम्राज्याचा नौदल तळ या ठिकाणी होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक क्रांतिकारक इथं बंदिवासात होते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला होता, याकडे शहा यांनी या संदेशातून लक्ष वेधलं आहे.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबवण्याचे तसंच फिरती पथकं तैनात करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संविधानावर आधारित विविध
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत
केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान, राहुल गांधी यांना धमकी प्रकरणाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राज्यभर भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलतांना, राहुल गांधी यांनी आरक्षण बंदींबाबत कोणतंही विधान केलं नसल्याचा दावा केला.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत माहिती आपण जाणून घेत आहोत. ब्रिटनमध्ये साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत जयश्री काशिद यांनी माहिती दिली:
“मातीच्या मूर्ती
लंडनमध्ये मिळतात. त्यातल्या बऱ्याच मूर्ती भारतातून आलेल्या असतात. अगदी
शास्त्रोक्त पद्धतीने अर्थ समजावून जयश्री दंडवते काकू अनेक वर्षापासून पूजा सांगत
आहे. दूरवरुन लोक दर्शनाला येत असल्याने प्रसाद हा जेवणासारखा असतो. पूर्णपणे
वर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो. लंडनपासून अर्ध्या तासावर असलेल्या साऊतंड सी
या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी एक दिवस स्थानिक प्रशासन परवानगी देते.
त्या दिवशी आसपासच्या भागातील शेकडो लोक किनाऱ्यावर जमतात. त्यामुळे भारतातच
चौपाटीवर विसर्जन सुरु आहे की काय असं एक क्षण वाटून जातं.’’
****
आशियायी हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत चीन, जपान, मलेशिया आणि कोरियाला हरवत उपांत्यफेरी गाठली आहे.
****
लष्करात भरतीचं आमिष दाखवून विविध राज्यातल्या शंभराहून अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या एकाला अहमदनगर इथ अटक करण्यात आली आहे. ही टोळी प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आज सकाळी दहा वाजता उद्घाटन होत आहे. केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रीय
प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा परवा सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात
पार पडणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं
वाळूजनजीक शिवराई फाट्यावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची धडक होऊन
झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड महिन्याच्या मुलासह त्याची आई आणि आजीचा समावेश आहे
****
No comments:
Post a Comment