Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात
आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण
जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई
करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात
संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा
दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी
भाषा सर्व
भारतीय भाषांना
पूरक असून
गेल्या दहा
वर्षात पंतप्रधान
नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखाली
हिंदी आणि
इतर स्थानिक
भाषांना समृद्ध
करण्यासाठी भरीव
कार्य झाल्याचं
केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा
यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक
महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत
होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर
हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ
देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले.
हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व
देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या
तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील
सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र
सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने
सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही
प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील
पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे
याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या
कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल मालवण
न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत
कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर
घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू
दिवसाचे औचित्य साधत येत्या १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग
सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं
व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर,
गुलबर्गा आदी
भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी
तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन
दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी
झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं
सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment