Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण
केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या
आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी
देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड
मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात
आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत.
कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं
मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत
वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान
अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत
सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत
त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय
बैठका होणार आहेत.
****
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला
साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ
किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव
चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या
बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात
जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून
प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा
ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला
भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं
जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला
असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण
अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे
पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक
जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच
चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात
त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक
वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात
आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता
विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब
मलिक यांचे जावई आहेत.
****
No comments:
Post a Comment