Wednesday, 18 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 18 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.

दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

***

केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.

***

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

***


पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

***

महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .

***

आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.

***

गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.

***

नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.

***

बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.

***

गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...