Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
सफाई मित्र सुरक्षा शिबीर, परिसर स्वच्छता आणि सर्वांचा सहभाग ही त्रिसुत्री आपण सर्वांनी
अंगिकारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.स्वच्छता ही
सेवा या राज्यस्तरीय अभियान पंधरवाड्याचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून शुभारंभ झाला.
त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छतेत सर्वांची भागिदारी असायला हवी असं सांगत त्यांनी
एक पेड माँ के नाम या उपक्रमात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होत असल्याचं सांगितलं.
पर्यटनस्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येणार असून स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही
त्यांनी यावेळी व्यक्त केला. महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातल्या
नागरी आणि ग्रामीण भागात “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता ” ही संकल्पना राबविण्यात
येणार आहे.
****
विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या
भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि २६ राज्य तसंच
१८ केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं.
या उपक्रमात जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील. अन्न प्रक्रिया
क्षेत्रातले नवे शोध, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा संगम
या उपक्रमाचा मुख्य भाग असेल.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित
शहा आज नवी दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत सहकार
मंत्रालयानं केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. या काळात
सहकार क्षेत्रासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत, असं शहा यांनी समाज
माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील
वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते
सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्ज त्यांच्या
हस्ते देण्यात येतील तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त ते टपाल तिकिटही जारी
करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची
पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळ विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य
कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल
गांधी यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा अपप्रचार आणि अपमानास्पद वक्तव्यांच्या
निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून
पाठींबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं
आहे.
****
इस्रोचं पहिलं मानवरहित अभियान गगनयान
तयार होत असल्याचं विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर
यांनी सांगितलं. बंगळुरु इथं आठव्या स्पेस एक्सपोच्या वेळी ते काल वार्ताहरांशी बोलत
होते. गगनयानाचा अंतराळात प्रक्षेपित करण्याचा भाग तयार झाला असून लवकरच तो श्रीहरिकोटा
इथल्या प्रक्षेपण तळावर पोहोचेल, असं ते म्हणाले. गगनयानचं उड्डाण
या वर्षाअखेरीपर्यंत अपेक्षित आहे. मुख्य उड्डाणापूर्वी तीन चाचण्या घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
बहुजन कल्याणाच्या योजनांसाठी निधी
कमी पडू देणार नाही अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण आणि गृहनिर्माण मंत्री अतुल
सावे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं 'उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा' या संकल्पनेतून आयोजित
विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या
‘विविध कल्याणकारी योजनांचा जागर’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. धनगर समाज, विमुक्त जाती आणि भटक्या
जमाती तसंच इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध
शिष्यवृत्ती आणि योजनांची माहिती सावे यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड
किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक
विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या
अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी
अनिल पाटील यांनी केलं आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या
मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव
सादर करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण
इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे
६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५०
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment