Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
September 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह
अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ
करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के पी
शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास
यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी सीईओ राऊंडटेबल कार्यक्रमात उद्योजकांशी
संवाद साधला.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील
मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पूंछ आणि
श्रीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत. या टप्प्यात परवा २५ सप्टेंबरला जम्मूतील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर
आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान
होत असून मतमोजणी ८ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज टोहाना आणि जगाधरी इथं प्रचार सभा घेणार आहेत तर
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अंबाला आणि घारौंदा इथं प्रचार सभेला संबोधित करतील.
हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी
झालेले एनपीपीचे मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके आज राष्ट्रपती पदाची शपथ
घेणार आहेत. अनुरा कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात
राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील काही मतदारसंघांच्या
संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सेमाडोह जवळ आज सकाळी आठ वाजेच्या
सुमारास खाजगी बस पुलावरुन घसरली, या अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची
प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात
आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात
येत आहेत. परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या
शहरांतून पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातील
चिखलदरा तालुक्यातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी
समाजात जनजागृती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली. तसंच विविध पदार्थ तयार करून
आहार प्रदर्शन भरवण्यात आलं. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात
आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस नुकतेच पूर्ण केले. सरकारनं
पहिल्या शंभर दिवसांत सामाजिक कल्याण योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात
परिवर्तन घडवून आणले आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या माध्यमातून
आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात येत आहे. या योजनेमुळं
धुळे जिल्ह्यात २१३ आदिवासी गावांना लाभ होणार आहे.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा
वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं
जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारनं
सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी
केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीनं बंदचं आवाहन
केलं आहे. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. बंदनिमित्त व्यापाऱ्यांनी शहरात
रॅली काढली होती. चार दिवसांपूर्वी शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत
घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण
पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या
पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून
येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे
गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना
सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी
भारतीय संघात बदल करण्यात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं
आज ही माहिती दिली. कानपूरमध्ये येत्या २७ तारखेपासून हा सामना सुरु होणार आहे.
****
आज सकाळी शेअर बाजार सुरु होताच निफ्टीनं नवा उच्चांक
गाठला. निफ्टी-५० निर्देशांकांत १०६ अंकांनी वाढ होऊन २५ हजार ८९८ अंकांपर्यंत पोहोचला.
काही वेळातच निफ्टीनं २५ हजार ९१० चा उच्चांक गाठला. तर, सेनसेक्स २८५ अंकांच्या वाढीसह ८४ हजार ८२५ अंकांपर्यंत पोहोचला.
****
No comments:
Post a Comment