Monday, 23 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, पुणे विमानतळाचं नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा निर्णय

·      कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार

·      विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान मुंबई दौऱ्यावर

·      स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात विविध उपक्रम

आणि

·      मराठा तसंच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बंद, ठिकठिकाणी निदर्शनं

****

पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यादेखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

राज्यातल्या १४ आयटीआय संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, यासह महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

****

कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून, खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे, त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३५ रुपये दरानं कांदाविक्री करत आहे. या आठवड्यापासून देशातल्या प्रमुख शहरांमधे अनुदानित दराने कांदाविक्री सुरू होणार असल्याची माहिती खरे यांनी दिली.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्जल भुयान, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर दरम्यान पुणे दौऱ्यावर येत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्याच्या तयारीचा आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने कामं करावी, वाहतुकीचं नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या आणि परवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

****

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक विशेषत: मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहीती आहे.

****

 

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मधे होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्याचा प्रचार आज संपला. या टप्प्यात परवा २५ तारखेला जम्मूतल्या रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतल्या २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी आठ आक्टोबरला होणार आहे.

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

****

स्वच्छता ही सेवा” अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज हम होंगे कामयाबमहा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हर्सूलगावात स्वच्छता रॅली, शाळेच्या विद्यार्थ्यांची हेरिटेज प्रभात फेरी, दिल्ली गेट हेरिटेज इथं नागरिक आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. भारताचा नकाशा काढून विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार केली, तसंच स्वच्छता जनजागृती बाबतीत पथनाट्य सादर करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही आज घेण्यात आलं. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी यावेळी उपस्थित होते. शिबिरात तालुक्यातील सफाई मित्र कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमासाठी रोपांचं वाटप करण्यात आलं.

हिंगोली नगर पालिकेच्यावतीने चीरागशह दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नगर पालिकेचे प्रशासक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला.

लातूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांसह शाळा-महाविद्यालयं बंद मध्ये सहभागी झाले होते. निलंगा इथं शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. परभणी शहरासह जिल्ह्यात आजही बंद ठेवण्यात आला होता. विविध मराठा संघटनांसह शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड इथंही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात काढलेल्या दुचाकी रॅलीदरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिलं.

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात आज धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. पूर्णा, पालम, गंगाखेड, झरीसह जिल्ह्यात अकरा ठिकाणी हे आंदोलन झालं. धुळे जिल्ह्यातही सकल धनगर समाजाच्या वतीने मुंबई-अग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

****

जातीय दंगली घडवणाऱ्यांना आणि भ्रष्ट सरकारला बाजूला करा, महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळे शहरात पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांवर जनता नाराज असून, आजवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण भविष्यात कदाचित कंत्राटदार आत्महत्या करतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका, पाटील यांनी केली.

****

आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते आज वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...