Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य
योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी,
महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर,
निरोगी आणि सुरक्षित
भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान
कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत
करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश आणि बिहार
या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असून, ते नेहमीच देशाला बळ देत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काढले. काल न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना
ते बोलत होते. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये भारतीय नागरिकांच्या भूमिकेचं
कौतुक करताना मोदी यांनी, जगासाठी, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ होतो, तर भारतासाठी AI
म्हणजे अमेरिकन-भारतीय
अशी भावना असल्याचं सांगितलं. भारतीय नागरिक उभय देशांना जोडण्याचं काम करतात आणि त्यांचं
कौशल्य आणि प्रतिभा अतुलनीय असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन
महामंडळ - आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
यात्रेकरुंसाठी भारत गौरव रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून
बद्रीनाथ, केदारनाथ,
कार्तिक स्वामी अशी
यात्रा करता येईल. ११ दिवसांच्या यात्रेची सुरुवात दोन ऑक्टोबरला मुंबईतून होणार आहे.
****
माहेश्वरी समाजाला लाभलेला सेवेचा
वारसा नवी पिढी कायम ठेवेल, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम
बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमात
बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध दिनानिमित्त
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल बाल कर्करुग्णांशी संवाद साधला. राज्यपालांच्या
हस्ते या बालकांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुलांना राजभवन
दाखवण्यात आलं.
दरम्यान, राज्यपालांनी काल विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला
मुंबईतल्या प्रार्थना समाज इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रथयात्रेत सहभागी झालेल्या
जैन संघाचं अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असं आवाहन राज्यपालांनी
यावेळी केलं.
****
रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना आधुनिक
तंत्रज्ञानाच्या सुविधा देऊ असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल
सातारा इथं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला
अभिवादन केल्यानंतर पवार बोलत होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं
राबवल्या जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत
वैद्यकीय सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त झाली आहे. पालिकेच्या
कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत सध्या
मुंबईत २४३ दवाखाने सुरु असून, १ हजार १४० कर्मचारी कार्यरत असल्याचं
त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत लवकरच आणखी ३७ नवे दवाखाने सुरु केले जाणार आहेत
अशी माहितीही त्यांनी दिली.
****
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी काल जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या
नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी
संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली
जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान
बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी काल मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत
नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे
कोस्टल रोडसाठी या भागात आखणी केल्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त
केली आहे.
****
अंबाजोगाई - लातूर रस्त्यावर नांदगाव
पाटीजवळ कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास
हा अपघात झाला. मृत सर्व जण लातूर जिल्ह्यातले रहीवाशी होते.
****
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी
वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीनं धाराशिव इथं काल ‘सामाजिक
संवाद मेळावा’ घेण्यात आला. संविधान अभ्यासक वाल्मीक निकाळजे, विवेक विचार मंचचे प्रांत समन्वयक अरुण कराड यांनी यावेळी मार्गदर्शन
केलं.
****
परभणीमध्ये काल लायन्स क्लबच्या
वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात ३४० जणांनी रक्तदान केलं.
****
कोल्हापूर शहरात काल रात्री उशिरा
मुसळधार पाऊस झाला. परतीच्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून शेती कामालाही
गती आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत
विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. जॉर्जियाच्या तब्लिसी
इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली
रझा नसीर याच्यावर अवघ्या ९० सेकंदात मात केली. संग्राम हा या स्पर्धेच्या ९३ किलो
वजनी गटात सर्वात वेगवान विजय नोंदवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
****
No comments:
Post a Comment