Wednesday, 23 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियात कझान इथं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्त व्यवस्थेबाबत दोन्ही देशांनी करार केला आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान आज ब्रिक्स अधिवेशनांनाही संबोधित करणार आहेत.

दरम्यान, मोदी यांनी काल रशिया आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. समस्यांचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. रशिया-युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत मदत करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले.

****

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीचं नवीन बोधचिन्ह आणि सात नव्या सेवांचं अनावरण करताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली. स्पॅम- फ्री नेटवर्क, नॅशनल वाय-फायरोमिंग, इंट्रानेट फायबर टीव्ही, एनीटाइम सिम किओस्क, डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा, सार्वजनिक संरक्षण - आपत्ती निवारण आणि खाणींमध्ये प्रथमच फाइव्ह-जी या सेवांचा त्यात समावेश आहे. फायबर टू द होम सेवेद्वारे ग्राहकांना बीएसएनएल हॉटस्पॉट्सवर नॅशनल वाय-फाय रोमिंग सुविधाही मोफत दिली जाईल. आपला देश हा स्वतःची फोर-जी दूरसंचार सेवा विकसित करणाऱ्या जगातील सहा देशांपैकी एक असून, आता फाइव्ह-जी सेवाही लवकरच सुरू होणार असल्यचं शिंदे यांनी सांगितलं.

****

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी, राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

बीड जिल्ह्यात काल ४८३ अर्जाची विक्री झाली तर तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. लातूर जिल्ह्यात अहमदपूर मधून पाच अपक्ष उमेदवारांनी काल अर्ज भरले.

परभणी तसंच जिंतूर विधानसभा मतदार संघात काल पहिल्याच दिवशी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं.

पाथरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालना जिल्ह्यात काल दोन जणांचे एकूण तीन अर्ज दाखल झाले. घनसावंगी मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चोथे यांनी दोन तर जालना विधानसभा मतदारसंघासाठी मिलिंद बोर्डे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४५ आणि शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी, काल घोषित करण्यात आली. महाविकास आघाडीतल्या शेतकरी कामगार पक्षानं काल रायगडमधल्या चार उमेदवारांसह आपले पाच उमेदवार जाहीर केले.

दरम्य़ान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा, उमेदवारी मिळालेल्यांचे प्रचार, तर दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश, अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

****

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी देखील लवकरच अंतिम होईल, अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती विद्यमान आमदार राजन साळवी यांनी दिली.

****


यवतमाळच्या आर्णी विधानसभेकरता भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांचं नाव नाही, त्यातच आता महायुतीतील शिवसेनेनं देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. मतदारसंघात असलेल्या तिन्ही तालुक्यांमधल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, या मतदारसंघात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

****

डॉक्टर मंडळींनी आपल्या रुग्णालयात दर्शनी भागात पोस्टर लावून तसंच आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी बी वैष्णवी यांनी केलं आहे. मतदार जनजागृती कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. शहरातल्या डॉक्टर वैद्यकीय व्यवसायिकांनी यावेळी उपस्थित राहून उपक्रमाला प्रतिसाद दिला.

****

वाशिम इथली विदर्भ साहित्य संघ शाखा आणि सावित्रीबाई फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री-पुरुषांच्या संवादासाठी या विषयावर स्त्री मुक्ती चळवळीच्या लेखिका गीताली विनायक मंदाकिनी यांचं काल व्याख्यान झालं. स्त्री मुक्ती हीच खरी मानव मुक्ती, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होतो म्हणजे ते कायदे वाईट असतात असे नाही, तर त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता महिला आणि पुरुषांनीही घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

****

मुख्याध्यापक संघाचं एकसष्टावं राज्यस्तरीय अधिवेशन २८ आणि २९ डिसेंबर रोजी लातूरला होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या लातूर मध्ये झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...