Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 24 October
2024
Time : 11.00
to 11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
रशियातल्या कझान
इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं.
या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा
झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी
आभार मानले.
****
देशातल्या नागरिकांकडून
रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
गेल्या तीन वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं
आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका
शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूपीआयचा गेल्या ५ वर्षांत किरकोळ
डिजिटल व्यवहारांत सर्वाधिक वाटा असल्याचं, या अहवालात म्हटलं
आहे.
****
महायुती आणि महाविकास
आघाडीमध्ये घटक पक्षाला जागा मिळल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांचा पक्षांतराचा ओघ सुरूच
आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी काल शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नाशिकमधल्या येवला लासलगाव मतदार संघातले
शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर शिक्षक
मतदार संघातले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून उद्धव बाळासाहेब
ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या
पक्ष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे
यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला.
भंडारा पवनी विधानसभा
क्षेत्र हे अनुसूचित जमाती करता राखीव असून, काँग्रेसनं या
मतदारसंघातून बौद्ध समाजातला उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाचे
स्थानिक पदाधिकारी करत आहेत. असे न केल्यास बंडखोरी करुन आपला उमेदवार उभा करु, असा इशारा देण्यात
आला आहे.
****
येत्या २० नोव्हेंबर
ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण
सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे सात चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले
जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या
संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर
जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
साहित्य संमेलनाचा
अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही, अध्यक्षपदासाठी
व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट मत
साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. दिल्ली
इथं होणाऱ्या ९८व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर भवाळकर
यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, आणि सरहद, यांच्यातर्फे
काल पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी
भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची बाब असली, तरी मराठी माणसांनी
मराठी भाषा बोलली, लिहिली आणि वाचल्याशिवाय मराठी भाषा
टिकणार नाही असंही भवाळकर यांनी सांगितलं.
****
महात्मा फुले
कृषि विद्यापीठानं संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना कृषि आणि शेतकरी कल्याण
मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.
पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन
राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे.
****
राज्यात आचारसंहिता
लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला
आळा घातला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात
अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये
किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई
लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारवर करण्यात आली. त्यामध्ये ५९ लिटर विदेशी
मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा मद्यसाठा आणि
वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात
निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी
करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक
शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर
मद्यसाठा देखील जप्त केला आहे.
****
पालघर जिल्ह्यात
ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात आणि नाचणी पिकांचं
मोठं नुकसान झालं असून, शासनानं या हंगामात ओला दुष्काळ
जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
****
भारत आणि जर्मनी
यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताला दोन गोल्सनी पराभव स्वीकारावा
लागला. राजधानी दिल्ली मध्ये सुमारे दहा वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामने होत आहे.
****
No comments:
Post a Comment