Wednesday, 17 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार आहे. हे काम फक्त कागदोपत्री राहिलेलं नसून, पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मराठवाड्यात उद्योग, पाणी पुरवठा, रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. दोन वर्षांपूर्वी हैदराबाद मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी माहिती दिली.

त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुक्ती संग्रामाचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

**

बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पवार यांनी हुतात्मा स्मारक इथं मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. या स्वातंत्र्यलढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य असून, त्यांचं स्मरण हेच आपल्या देशभक्तीचं बळ आहे, असं त्यांनी नमूद केलं.

जालना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

****

बहुप्रतिक्षित अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वेसेवेचं आज लोकार्पण होत आहे. बीड रेल्वेस्थानकावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अमळनेतर ते बीड या नवीन रेल्वेमार्गाचं लोकार्पण तसंच बीड-अहिल्यानगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

****

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरूवात होणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

सेवा पंधरवड्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झाला. यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोदी विकास मॅरेथॉन, यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण आणि नविन नगरपंचायत, नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीड इथं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यमान कार्डचं जलद गतीने वितरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बीड इथलं वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा देखील पवार यांनी आढावा घेतला.

****

विभागात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे दोन फूट उचलून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इसापूर धरणातून १५ हजार, माजलगाव तसंच उर्ध्व मानार प्रकल्पातून प्रत्येकी सुमारे आठ हजार, निम्न तेरणा प्रकल्पातून सुमारे नऊ हजार, तर विष्णुपुरी धरणातून सुमारे एक लाख ३८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणातूनही ५८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

No comments: