Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24 November 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
सशस्त्र दलांची खरी ताकद त्यांच्या
परस्परसंबंधात आहे, असं
प्रतिपादन नौदलप्रमुख एडमिरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं. मुंबईत आज, भारतीय नौदलाची सामर्थ्यवृद्धी करणारी ‘माहे’ ही नवी पाणबुडीरोधी, उथळ पाण्यात कार्य करणारी युद्धनौका, द्विवेदी यांच्या
उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली, त्यावेळी ते बोलत होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी
भारताने केलेलं ऑपरेशन सिंदूर, या लष्करी एकतेचं योग्य प्रमाण
असल्याचं ते म्हणाले. आजच्या युगात, जिथे अनेक आघाड्यांवर दक्षता
आवश्यक आहे, तिथे भारताची सुरक्षा व्यवस्था समुद्राच्या खोलीपासून
देशाच्या सर्वोच्च सीमेपर्यंत असल्याचं द्विवेदी यांनी नमूद केलं.
कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार
झालेल्या माहे या युद्धनौकेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात
आला आहे. मलबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक ‘माहे’ गावावरून हिचं नामकरण करण्यात आलं असून, तिचं प्रतीक असलेली उरुमी तलवार केरळच्या
प्राचीन कलरीपयट्टू युद्धकलेची परंपरा जपते. देशाच्या समुद्री सुरक्षेसाठी समर्पित
‘माहे’ पश्चिम किनाऱ्यावर तैनात राहून भारताची सागरी क्षमता अधिक भक्कम करणार आहे.
****
देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून
न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी, लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते.
सरन्यायाधीश सूर्य कांत पुढील १५
महिने देशाच्या न्यायव्यवस्थेचं नेतृत्व करणार असून, वयोमानानुसार ते नऊ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त
होतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कलम ३७० रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकत्व हक्क, आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासारख्या अनेक महत्त्वाच्या
खटल्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
****
भूतानमधून भगवान गौतम बुद्धांचे
अवशेष परत आणण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज भूतानला रवाना झाले.
भूतानने आयोजित केलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवासाठी विशेष सन्मान म्हणून
प्रदर्शनासाठी हे अवशेष पाठवण्यात आले होते.
****
राष्ट्रीय महिला आयोगाने संकटात
सापडलेल्या महिलांना जलद आणि अधिक सुलभ मदत मिळावी यासाठी १४४९० हा एक नवीन हेल्पलाइन
क्रमांक सुरू केला आहे. हा टोल-फ्री क्रमांक आयोगाच्या विद्यमान हेल्पलाइनशी जोडलेला
एक सहज लक्षात ठेवता येणारा शॉर्ट कोड आहे, ज्यामुळे महिलांना विलंब न करता मदत मिळू शकते,
असं आयोगाने एका निवेदनात म्हटलं आहे. हिंसाचार, छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करणाऱ्या महिलांना त्वरित मदत
देण्यासाठी आयोगाच्या चालू प्रयत्नांना हा नवीन हेल्पलाइन क्रमांक बळकटी देईल,
असं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांचा ३५०वा हौतात्म्य
दिन आज पाळण्यात येत आहे. १६७५ साली मुघल शासक औरंगजेब याच्या आदेशावरुन तेगबहादूर
यांना ठार करण्यात आलं होतं. या दिवसाला हुतात्मा दिन म्हणलं जातं. गुरु तेगबहादूर
यांनी देशभरात गुरुनानक देव यांच्या संदेशाचा प्रसार केला. नांदेड इथं हौतात्म्य दिनानिमित्त
अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या तीन रस्त्यांसाठी
केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून ४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात
आला आहे. यामुळे महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने दळणवळणाला चालना
मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने उद्यापासून २७ नोव्हेंबर पर्यंत साहित्य
आणि सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. यात कवी संमेलन, सुगम आणि शास्त्रीय संगीत, शालेय चित्रकला आणि बाल आनंद मेळावा, यशवंतराव चव्हाण
स्मृती पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे
यांनी दिली. या महोत्सवादरम्यान येत्या गुरुवारी २७ तारखेला शेतकरी परिषद होणार असून,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण
हे 'यशवंतराव चव्हाणांचे कृषी, औद्योगिक
धोरण आणि वर्तमान शेती' या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार
आहेत.
****
टोकियो इथं झालेल्या मूकबधिरांच्या
ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताच्या अभिनव देशवालने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक
पटकावलं. शेवटच्या शॉटमध्ये झालेल्या खराब कामगिरीनंतरही त्याने अंतिम फेरीत वर्चस्व
गाजवलं.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या तिसर्या दिवशी भारतीय फलंदाजांनी
निराशाजनक खेळी केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात सात बाद
१५९ धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वालनं ५८, तर के एल राहुलने २२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४८९ धावांवर
संपुष्टात आला. भारत सध्या ३३० धावांनी पिछाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment